अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा

अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा

Published on

अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा
महापालिकेची १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम; गुन्हे दाखल होणार
कल्याण, ता. १ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे मुख्य रस्ते हे अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर्समुळे विद्रूप झाले आहेत. हे विद्रुपीकरण नष्ट करण्यासाठी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार पालिका परिसरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवरील अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक, झेंडे तसेच होर्डिंग निष्कासनाची धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रभाग पाच ड प्रभाग क्षेत्राअंतर्गत निष्कासनास १ ऑगस्टपासून सुरुवात केली असून १५ ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे, असे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी सांगितले आहे.

पावसाळ्यात अनधिकृत होर्डिंग कोसळून होणारे जीवित व वित्तहानी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत काही बाबींचे निरीक्षण करून कार्यवाही करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महापालिकेच्या परवानगीशिवाय लावलेल्या अनधिकृत होर्डिंग हटवले जातील. कालबाह्य अथवा परवानगीची मुदत संपुष्टात आलेले तसेच जीर्ण व कमकुवत झालेल्या सर्व होर्डिंग हटविले जातील. त्याचबरोबर महाराष्ट्र महापालिका अधिनियम, महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण व विरुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे.

कोणत्या भागात होणार कारवाई?
• श्रीराम टॉकीज ते विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक
• काटेमानिवली नाका ते चक्की नाका पुनालिंक रोड
• चक्की नाका ते सूचक नाका
• चक्की नाका ते मातोश्री हाइट्सपर्यंत, श्री मलंगगड रोड
• श्री मलंगगड रोड ते म्हात्रे चौक, साकेत कॉलेज, प्रभाग ९/आयपर्यंत १०० फुटी रस्ता
• अपर्णा डेअरी ते खडेगोळवली गाव व टाटा कॉलनी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शंकर पावशे रोड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रायगड कॉलनी, वीर सावरकर चौक, सूर्या शाळा परिसर व कमलादेवी कॉलेज परिसर
• चिंचपाडा रोड म्हात्रे चौक व ६० फुटी रस्ता व जाईबाई शाळा रोड
• विजयनगर नाका ते आमराई, चिंचपाडा रस्ता, ६० फुटी रोड
• तिसगाव नाका ते तिसगाव रस्ता तसेच श्रीमलंग रोड ते गावदेवी रस्ता तिसगाव

नागरिकांना सहकार्याचे आवाहन
कारवाईत पोलिस प्रशासन आणि विविध यंत्रणांचा समन्वय राखला जात असून कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असणार आहे. ५/ड प्रभागक्षेत्र कार्यालयाकडून सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आजी-माजी लोकप्रतिनिधी, तसेच स्थानिक नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की त्यांनी स्वतःच २४ तासांत आपले पोस्टर होर्डिंग काढून महापालिकेस सहकार्य करावे. शहराचे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी ही मोहीम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करून शहराचे सौंदर्य आणि स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा. महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण रोखता येईल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com