रंगीबिरंगी राख्यांनी सजल्या बाजारपेठा
पनवेल, ता. ३ (बातमीदार) : भावंडांच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण शनिवारी (ता. ९) साजरा होणार असून, त्यानिमित्त पनवेलसह परिसरातील बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. रक्षाबंधन हा फक्त सण नसून बहिणीच्या प्रेमाची, भावाच्या रक्षणाच्या वचनाची आठवण करून देणारा खास दिवस आहे. त्यामुळे राखी खरेदीला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील बाजारपेठांमध्ये यंदा प्रभू श्रीराम, महाकाल, शिव, रुद्र यांच्या प्रतिमांनी सजलेल्या राख्या तसेच लहान मुलांसाठी स्पायडरमॅन, छोटा भीम, पेपा पिगसारख्या कार्टून राख्यांची रेलचेल आहे. काळानुरूप हलक्या वजनाच्या, एक किंवा अनेक दोऱ्यांच्या सिंगल राख्यांना मोठी मागणी आहे. पारंपरिक मोती, मेटल, मल्टी स्टोन, कलर स्टोन व डायमंड राख्यांबरोबरच तरुणींमध्ये ब्रेसलेट राख्यांनाही विशेष पसंती मिळत आहे. शहरातील खारघर, कामोठा, कळंबोली, खांदेश्वर येथेही विविध प्रकारच्या राख्यांची दुकाने सजली असून, चंडीगडहून यंदा दर्जेदार राख्यांची आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
-------------------------
२० रुपयांपासून उपलब्ध
मुलींसाठी खास डायमंड, मल्टी स्टोन व कलर स्टोन राख्या बाजारात आल्या असून, २० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत त्या उपलब्ध आहेत. आकर्षक डिझाइन्स आणि हलक्या राख्यांना खरेदीदारांचा चांगला प्रतिसाद आहे.
-------------------------------------
ब्रेसलेट राख्यांना पसंती
तरुण बहिणीकडून भावासाठी खास ब्रेसलेट राख्या निवडल्या जात असून, जय श्रीराम, महाकाल, कृष्ण थीमवर आधारित राख्याही ट्रेंडमध्ये आहेत. लहान मुलांमध्ये कार्टून राखी आजही लोकप्रिय आहे.