आता प्राण्यांसाठी हि दफनभूमी

आता प्राण्यांसाठी हि दफनभूमी

Published on

आता प्राण्यांसाठीही दफनभूमी
ठाण्यातील कोपरी आणि बाळकूममध्ये दफनभूमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : पालिका क्षेत्रातील २३ स्मशानभूमींचा कायापालट करण्यात येत आहे. या स्मशानभूमींमध्ये प्राण्यांसाठीदेखील दफनभूमी तयार करण्यात येत आहेत. त्यानुसार कोपरी आणि बाळकूम या दोन्ही ठिकाणी दफनभूमी सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी छोट्यांसह मोठ्या प्राण्यांसाठीदेखील जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
ठाणे पालिका क्षेत्रातील स्मशानभूमीचा विकास व कायापालट एकात्मिक विकास या कार्यक्रमांतर्गत करण्यात येत आहे. असे असताना ठाणे पालिका क्षेत्रात प्राण्यांसाठी दफनभूमी नसल्यामुळे मुंबईला धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रात प्राण्यांसाठी दफनभूमीची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार पालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, ठाण्यात दोन ठिकाणी प्राण्यांसाठी दफनभूमी तयार करण्यात येत आहेत. कोपरी आणि बाळकूम भागात या दफनभूमी असणार आहेत. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याचे काम सुरू केले आहे. त्यानंतर ते पूर्ण झाल्यावर स्थावर मालमत्ता विभागाकडे हस्तांतरित केली जाणार असून, ती आरोग्य विभागाकडे दिली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. दरम्यान, या दफनभूमींना काहीसा विरोध आहे. त्यामुळे येथे काम होत असले तरीदेखील येथील स्थानिकांचा विरोध महापालिकेला मवाळ करावा लागणार आहे. या दोन्ही दफनभूमींच्या ठिकाणी इलेक्ट्रिक शवदाहिनी बसविली जाणार आहे. या कामांसाठी सुमारे ८० लाखांचा खर्च केला जात आहे. या ठिकाणी छोट्यांसह मोठ्या प्राण्यांचीदेखील व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com