शेकापच्या अस्तित्वाला बळ

शेकापच्या अस्तित्वाला बळ

Published on

शेकापच्या अस्तित्वाला बळ
नवीन पनवेलमधील मेळाव्यात मविआचे शक्तिप्रदर्शन
पनवेल, ता. २ (बातमीदार)ः शेतकरी कामगार पक्षाचा ७८वा वर्धापनदिन नवीन पनवेलमध्ये साजरा करण्यात आला. पक्षाची झालेली वाताहत, भाजपमुळे लागलेल्या गळतीमुळे राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याला एक अनन्यसाधारण महत्त्व होते. या वेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने हा मेळावा शेकापसाठी नवी संजीवनी ठरेल, अशी आशा आहे.
रायगडच नव्हे तर राज्याच्या राजकारणात अत्यंत मुरब्बी समजल्या जाणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांनी राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मेळाव्यासाठी निमंत्रित केले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापनदिन पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावर भर देत सरकारवर तोफ डागली. भाषा आणि जमीन हिरावली जाते, तेव्हा तुमचे अस्तित्व संपते. रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पासाठी जमीन घेतली जात आहे. विशेष करून बाहेरचे लोक मालक झाले आहेत. भविष्यात रायगड- पनवेलमध्ये परप्रांतीय खासदार, आमदार आणि नगरसेवक होतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. त्यामुळे पक्षीय राजकारण सोडून मराठी मुद्द्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
--------------------------------------
मराठीवरून भाजपवर आसूड
- राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर भाषणामध्ये संशय व्यक्त केला. महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत; मात्र या राज्यात व्यवसायासाठी आलेल्या हिंदी भाषिकांना मराठी बोलण्याकरिता त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची सक्ती केली जात नाही, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले.
- देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे गुजरातचे आहेत. त्यांच्या राज्यामध्ये इतरांना जमीन घेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. जर तेथे खरेदी करायची असेल तर रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते. इतक्या जाचक अटी लादण्यात आलेले आहेत. जर देशाचे राज्यकर्तेच आपल्या राज्यामध्ये अशाप्रकारे अस्मिता दाखवत असतील तर आम्ही मराठी माणसासाठी का पुढे येऊ नये? आमचा विचार आपण का संकुचित ठरवत आहात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
-----------------------------
...तर कसला शेतकरी कामगार पक्ष!
महाराष्ट्रात आज शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. या ठिकाणी येणाऱ्या उद्योगधंद्यात मराठी मुलांना रोजगार दिला जात नाही. ही अत्यंत विदारक परिस्थिती आहे. अशाप्रकारे शेतकरी आणि कामगारांवर अन्याय होत असताना जर आपण भूमिका घेतली नाही तर तो कसला शेतकरी कामगार पक्ष, अशा शब्दात राज ठाकरे यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला.
-----------------------
व्यासपीठावर दोन भगवे
शिवसेनेच्या स्थापनेवेळी कॉम्रेड प्रल्हाद डांगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या वेळी शिवसेना आणि डावे पक्ष हे वेगळ्या विचारांच्या टोकाला होते; मात्र भगव्याच्या व्यासपीठावर लाल झेंडा त्या वेळी फडकला होता. लालबावट्याच्या वर्धापनदिनी दोन भगवे झेंडे आपण फडकवले आहात, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थितांना जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com