मराठी माणसाने मराठी अस्मिता जपली पाहिजे

मराठी माणसाने मराठी अस्मिता जपली पाहिजे

Published on

मराठी माणसाने मराठी अस्मिता जपली पाहिजे
शेकापच्या मेळाव्याला राज ठाकरे यांची उपस्थिती

किंवा
विरोधकांचा आवाज दाबण्याचा डाव
शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरे यांची सरकारवर टीका

कामोठे, ता. २ (बातमीदार) : ‘देशाला दिशा देणारा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, यासाठी प्रत्येक मराठी माणसाने मराठी अस्मिता जपली पाहिजे. परप्रांतीय उद्योजकांच्या घशात जमिनी घालू नका, व्यवसायात भागीदार व्हा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये भूमिपुत्रालाच रोजगार, व्यवसाय मिळाला पाहिजे,’ असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन पनवेल येथे केले. जनसुरक्षा कायद्याअंतर्गत सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा डाव रचत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी या वेळी केला.

नवीन पनवेल सेक्टर ५ मधील पोलिस मैदानावर माजी आमदार दत्तूशेठ पाटील सभागृहात शेतकरी कामगार पक्षाचा ७८वा वर्धापनदिन शनिवारी (ता. २) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी खासदार संजय राऊत, शेकाप सरचटणीस जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, शेकापचे बाबासाहेब देशमुख, बाळाराम पाटील, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, राजू पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह मविआतील नेते आणि रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेकापचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

राज ठाकरे या वेळी म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला शेकाप आजही राजकीय अस्तित्व टिकवून आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने लाल बावट्याच्या सोबतीला शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचे भगवे झेंडे आले आहेत. महाराष्ट्रात दलबदलू राजकारण्यांचा व्हायरस पसरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिंदी भाषेची सक्ती करू पाहात आहेत; मात्र त्यांचे भूमिपुत्रांच्या समस्यांकडे, रोजगाराकडे दुर्लक्ष झाले आहे. रायगड आणि कोकणात परप्रांतीय कामगारांचा लोंढा वाढत आहे. परप्रांतीय गुंतवणूकदारांनी कोकणातील जमिनी विकत घेतल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यामध्ये डान्सबार संस्कृती बोकाळत आहे.’ या वेळी जयंत पाटील यांनी आगामी काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेकाप रायगड आणि महाराष्ट्रात ताकदीने उतरेल, असा विश्वास व्यक्त केला.


अटक करून दाखवाच!
राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत. गुजरातमध्ये परराज्यातील व्यक्तींना जमीन घेण्यासाठी जाचक अटी आहेत. हे सारे विसंगत आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर नाही तर मराठी माणसांचा मानसन्मान राखून उद्योग, व्यवसाय सुरू झाले पाहिजेत.
जनसुरक्षा कायद्याअंतर्गत सरकारने विरोधकांचा, आंदोलकांचा आवाज दाबण्याचा डाव रचला आहे. आम्हाला अटक करून दाखवाच, असेही राज ठाकरे यांनी सरकारला ठणकावले.

शेकाप आणि शिवसेना यांची राजकीय, सामाजिक वाटचाल संघर्षमय आहे. स्वातंत्र्यलढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शेकापचे महत्त्वाचे योगदान आहे. सत्ताधारी पक्षाच्या ध्येयधोरणामुळे महाराष्ट्राचे आणि देशाचे वातावरण दूषित झाले आहे. हे सरकार भांडवलदारधार्जिणे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आणि समविचारी पक्ष आगामी काळात महाराष्ट्राला प्रगतिपथावर घेऊन जाईल.
- संजय राऊत, खासदार

शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा रयतेचे, महाविकास आघाडीचे राज्य येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात समविचारी पक्षांना विचारात घेऊन काम करणार येणार आहे.
- शशिकांत शिंदे, आमदार

महाराष्ट्राच्या राजकारणात तरुण पिढीला काम करण्यासाठी शेकापमध्ये पोषक वातावरण आहे. शेकाप पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी खेडोपाड्यात, वाडीवस्तीवर जाऊन जनसंपर्क वाढवण्याची गरज आहे. यासाठी ज्येष्ठ शेकाप नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
- बाबासाहेब देशमुख, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com