लाल बावट्याचे शक्तिप्रदर्शन
लाल बावट्याचे शक्तिप्रदर्शन
शेकापचा ७८व्या वर्धापनदिनाचा उत्साह
कामोठे, ता. २ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील राजकारणात कधीकाळी बलाढ्य पक्ष असलेल्या शेकापचा ७८वा वर्धापनदिन शनिवारी (ता. २) नवीन पनवेल येथे पार पडला. या वेळी विचारांचे सोने लुटण्यासाठी हजारो कार्यकर्ते रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नवीन पनवेल येथे एकवटले होते होते. या वेळी लाल बावट्याच्या जयघोषाने कार्यक्रम स्थळ दणाणत होते.
विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात शेकापला अपयश आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, निवडणुकीच्या नंतर अलिबाग, पेण, पनवेल आणि उरण तालुक्यातील शेकापचे अनेक बडे नेते पक्ष सोडून गेल्यामुळे राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. पनवेलमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शेकापची बडी मंडळी भाजपच्या गळाला लागली. ही घटना शेकाप पक्षनेतृत्व आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष संघटना नव्याने उभी करणे आणि पक्ष सोडून गेलेल्या लोकांना निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी शेकाप नेतृत्वाने पनवेल येथे वर्धापनदिनाचे आयोजन केले होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
-------------------------
राज ठाकरे, संजय राऊत आकर्षण
वर्धापनदिनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्यामुळे शेकाप, मनसे, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत या कार्यक्रमाचे आकर्षण होते. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत राज ठाकरे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन झाले. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील यांनी राज ठाकरे यांचे व्यासपीठावर हार्दिक स्वागत केले. या वेळी राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या ध्येयधोरणावर सडकून टीका केली. रायगड आणि कोकणातील भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी विकू नका, असा सल्ला त्यांनी दिला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूमिपुत्रांना रोजगार, व्यवसाय मिळाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
-----------------------------------------
२०० पदाधिकारी तैनात
शेकापचे पनवेलमधील सुमारे २०० पदाधिकारी, कार्यकर्ते अनेक दिवस मेहनत घेत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठासमोर मशाल प्रज्वलित करण्यात आली. लाल बावट्याचे ध्वजारोहण झाले. ध्वजगीतानंतर जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी मागील वर्षाचे अहवाल वाचन केले. मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. १० हजार तांदळाच्या भाकरी, बटाट्याची सुकी भाजी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, असा जेवणाचा बेत ठेवण्यात आला होता.
-------------------------------------
मेळाव्यावर लाल रंगाची छटा
वर्धापनदिनाला शेकडो स्त्रियांनी लाल साडी आणि पुरुष कार्यकर्त्यांनी लाल शर्ट परिधान केले होते. त्यामुळे परिसरात लाल रंगाची छटा पसरली होती. जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच तरुण कार्यकर्त्यांनी वर्धापनदिनाला आवर्जून हजेरी लावली. नेत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी व्यासपीठावर तरुणांची गर्दी झाली होती. सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांची विशेष गर्दी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.