पाचव्या फेरीत आरक्षणाचे नियम धाब्यावर
पाचव्या फेरीत आरक्षणाचे नियम धाब्यावर
अकरावी प्रवेश : आढाव्याविनाच सर्व प्रवेश खुल्या प्रवर्गात
संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरीतील प्रवेशाची मुदत शनिवारी (ता. २) संपली. या फेरीनंतर पाचव्या फेरीचे नियोजन सुरू आहे. या फेरीपासून सर्वच प्रवेश हे खुल्या प्रवर्गातून केले जाणार आहेत. यामुळे या फेरीपासून विविध राखीव प्रवर्गांतील जागांसाठी असलेले आरक्षणाचे नियम शिक्षण संचालनालयाकडूनच धाब्यावर बसवले जाणार आहेत.
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या एकूण जागा नऊ हजार ४८३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध असलेल्या १४ लाख १९ हजार ८१३ जागांवरील प्रवेशासाठी आतापर्यंत चार मुख्य प्रवेश फेऱ्यांतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. यात नऊ लाखांच्या दरम्यान प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित सुमारे पाच लाखांच्या दरम्यान जागा रिक्त आहेत. या जागांवर प्रवेशासाठी पाचवी फेरी आयोजित केली जाणार आहे. यात रिक्त असलेल्या सर्व जागा या खुल्या प्रवर्गाप्रमाणे भरल्या जाणार असल्याने विविध प्रकारच्या राखीव प्रवर्गांतील विद्यार्थ्यांची यात मोठी अडचण होणार आहे. त्यांना आपल्या प्रवेशासाठी आरक्षणाच्या संविधानिक अधिकाराला मुकावे लागणार असल्याने याविषयी शिक्षण विभागाने चौथ्या फेरीतील रिक्त राहिलेल्या जागांत आरक्षणनिहाय जागांवर प्रवेश द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
--
कटऑफचा क्रम वाढेल!
खासगी महाविद्यालयांत खूप मोठ्या प्रमाणात राखीव जागांवरील आरक्षण नाकारून त्यांना खुल्या प्रवर्गाप्रमाणे प्रवेश दिला जातो. यात व्यवस्थापन, इनहाऊस कोट्यातील प्रवेशही असेच केले जातात. यामुळे सर्वच प्रवेश खुल्या प्रवर्गासाठी खुले केल्यास सर्व महाविद्यालयांत कटऑफ वाढलेला दिसेल. यासोबत प्रवेशाची संख्याही त्याच प्रमाणात वाढेल. मात्र यातून राखीव जागांवरील विद्यार्थी आपल्या अधिकाराला मुकतील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
--
राखीव जागांसाठी नियम
अकरावी ऑनलाइन प्रवेशाची मुख्य फेरी पूर्ण झाल्यानंतर प्रवेश न झालेल्या राखीव जागांचा आढावा घेऊन त्या पुढील फेरीतही राखीव ठेवल्या पाहिजेत. त्या जागांवर गुणवत्तेनुसार प्रवेश देणे बंधनकारक असते. राखीव कोट्यातील जागांवर इतर कोणत्याही खुल्या प्रवर्गातील प्रवेश देता येत नाहीत; मात्र नोकरी आणि इतर प्रकारचे आरक्षण लावून विभागाकडून अकरावीच्या मूळ आरक्षण धोरणालाच हरताळ फासत असल्याचे दिसून आले आहे.
--
आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांत सर्व राखीव जागांसाठी विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती. त्यांच्या रिक्त राहिलेल्या जागा आता पाचव्या फेरीपासून खुल्या प्रवर्गासाठी समर्पित केल्या जातील; मात्र यात राखीव जागा किती भरल्या गेल्या नाहीत याची माहितीही जाहीर केली जाईल.
- डॉ. श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक शिक्षण संचालनालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.