अग्निशमन दलाची होतेय पायपीट

अग्निशमन दलाची होतेय पायपीट

Published on

डोंगरावर जाताय, सावधान!
- मुंब्रा आणि येऊर डोंगरमाथ्यावर फिरणाऱ्या तरुणाईच्या शोधासाठी अग्निशमन दलाची होतेय पायपीट
-चार घटनांत २२ जणांची सुटका करण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये डोंगराला हिरव्या शालूचा साज चढलेला असतो. या निर्सगाचा आनंद घेण्यासाठी तरुण मंडळींचा ओघ हा नेहमीच पाहण्यास मिळतो. मात्र परतीच्या प्रवासादरम्यान अंधारात ही मंडळी वाट चुकते. अशा मंडळींच्या शोधमोहिमेत ठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांची अक्षरशः पायपीट होत आहे. अशाप्रकारे वर्षभरात मुंब्रा आणि येऊर या डोंगरात भरकटलेल्या तब्बल २२ तरुणांची सुखरूप सुटका करण्यात या विभागांना यश आले आहे. यामध्ये मुंब्रा हा डोंगर भूलभूलय्या असल्याने तेथे जाताय तर सावधान, असेच म्हणावे लागणार आहे.
ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहराच्या एका बाजूला खाडी आहे, तर दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. यामध्ये येऊर हे निर्सगरम्य ठिकाण आहे. त्याचबरोबर कळवा आणि मुंब्रा हे डोंगराच्या अलीकडे आणि पलीकडे आहे. यामध्ये मुंब्र्यात डोंगराचा जास्त भाग असल्याने तरुणाईची पसंती मिळते. यामुळे मुंब्रा बायपास परिसरातील डोंगरावर या वर्षभरात तीन घटनांमध्ये तब्बल डझनभर तरुण रस्ता चुकल्याने अडकले होते. या घटना रात्रीच्या सुमारास घडल्या होत्या. त्यामुळे त्यांना शोधणे जिकिरीचे होऊन बसले होते. या वेळी स्थानिक नागरिक मदतीला आल्याने वाट चुकणाऱ्या मंडळींचा वेळीच शोध घेता आला. याचदरम्यान येऊर येथे दिवसा ट्रेकिंगला गेलेली १० मुले मधमाश्या चावण्याच्या भीतीने अडकली होती.

घटना आणि सुटका केलेली तरुणाई
वर्ष डोंगर तरुणाई
५/०७/२०२४ मुंब्रा बायपास ०५
३/०९/२०२४ मुंब्रा बायपस ०२
३०/१२/२०२४ येऊर १०
२७/०७/२०२५ मुंब्रा बायपास ०५

अशा घटनांमध्ये स्थानिकांचे मोठे सहकार्य लाभते. त्यांच्या मदतीने अशा भरकटलेल्या तरुणाईचा वेळीच शोध घेता येतो. त्यातच जर डोंगरावर जात असाल तर येताना अंधार होण्याची वाट बघत बसू नका. विशेषत: पावसाळ्यात रस्ता चुकण्याची शक्यता जास्त असते. परिसराची माहिती असणाऱ्या व्यक्तींना सोबतीला घेऊन जावे.
- यासिन तडवी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठामपा.

मधमाश्या चावतील या भीतीने लपले होते
ठाण्याचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर येथे ठाणे शहर, नवी मुंबई आणि मुंबईमधील १३ जण ट्रेकिंगला गेले होते. या वेळी मधमाश्या तिघांना चावल्याने १० जण त्या भीतीने अडकले होते. त्या १८ वर्षीय तरुणाईची माहिती मिळताच वेळीच सुटका करण्यात आली होती. या वेळी तिघांना मधमाश्‍यांनी दंश केला होता. हा प्रकार ३० डिसेंबर २०२४ रोजी समोर आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com