निवडणुकीपूर्वीच कलानी गटात मोठा ब्रेकअप?

निवडणुकीपूर्वीच कलानी गटात मोठा ब्रेकअप?

Published on

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात एकापाठोपाठ एक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नेत्यांच्या निष्ठा व पक्षांतरामुळे राजकीय रणांगण ढवळून निघाले आहे. शहरातील सत्तेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ओमी पप्पू कालानी यांच्या गटात भाजपने मोठी फूट पाडल्याची चर्चा आहे. कलानी यांचे अनेक जुने व कट्टर समर्थक भाजपच्या उंबरठ्यावर जाऊन उभे ठाकले आहेत. सत्तेच्या समीकरणात नव्याने आकार घेत असलेले हे राजकारण आता राकांपा (शरद पवार) गटापासून पूर्णपणे वेगळे होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
काही महिन्यांपासून कलानी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी उल्हासनगर शहर गाजवले होते. कलानी यांनी थेट भाजप प्रवेश केला नसला, तरी त्यांच्या गोटातील अनेक नेते आणि माजी नगरसेवकांनी मात्र पक्षांतराची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. काही जण प्रत्यक्ष भाजपमध्ये प्रवेशासाठी हालचाली करत आहेत. काहींनी आतापर्यंत गुपचूप संबंध जोडले आहेत. विशेष म्हणजे, २९ जुलैला कलानी गटातील काही वरिष्ठ नेते भाजपात प्रवेश करणार होते. या पक्ष प्रवेशासाठी विविध आश्वासने, राजकीय गणितांची देवाणघेवाण, बैठका या सर्व गोष्टी पार पडल्या होत्या. मात्र, शेवटच्या क्षणी भाजपने हा कार्यक्रम स्थगित केला. या निर्णयाचा फायदा घेत कलानी यांनी काही निष्ठावान कार्यकर्त्यांना परत आपल्याकडे वळवले.
या साऱ्या राजकीय हालचालींमध्ये कलानी यांनाही भाजपात येण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण, भाजपात त्यांचे मित्रापेक्षा विरोधक जास्त असल्याने त्यांनी सध्या आपली भूमिका सावध ठेवली आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)पासून अंतर घेत पुन्हा एकदा आपली टीम ओमी कालानी (टीओके) सक्रिय करत महापालिका निवडणुकीत उतरायची रणनीती आखली आहे. कलानी गटाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, टीओके ही युतीसाठी भाजप, शिवसेना तसेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट यांच्यासोबत तयार आहेत. तसेच सत्तेचा भाग होण्यासाठी जागा वाटपावरही चर्चेला कलानी तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या साऱ्या खेळीमुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे. कलानी यांनी पुन्हा एकदा त्यांच्यासोबतचा राजकीय नातेसंबंध तोडल्याचे स्पष्ट होत आहे.


सत्तासमीकरणांची दिशा
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीची शिडी चढण्यासाठी आता फक्त विकासाचा अजेंडा नव्हे, तर राजकीय फूट, निष्ठा बदल, युतीचे सौदे आणि धोक्याची गणिते निर्णायक ठरणार आहेत. कलानी आणि भाजपमधील ही राजकीय कुरघोडी आगामी महापालिकेतील सत्तासमीकरणांची दिशा ठरवेल, हे मात्र निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com