कबुतरखाना हटवण्यास स्थानिकांचा विरोध
कबुतरखाना हटवण्यास
स्थानिकांचा विरोध
पालिकेच्या पथकाला पाठवले माघारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना हटवण्याची कारवाई करणाऱ्या पालिकेच्या पथकाला स्थानिकांच्या विरोधामुळे माघारी फिरावे लागले. स्थानिक नागरिकांनी गोंधळ घातल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फौजफाटा मागविण्यात आल्यानंतरही पालिकेच्या पथकाला माघार घ्यावी लागली.
दादरच्या या कबुतरखान्याला ब्रिटिशकालीन वारसा असून, १९३३ मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून त्याची निर्मिती झाली होती. कालांतराने येथे कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रकार सुरू झाला आणि या जागेचे कबुतरखान्यात रूपांतर झाले; मात्र इथे जमणाऱ्या कबुतरांच्या थव्यामुळे विष्ठा, पिसे आणि दाण्यांमुळे परिसरात अस्वच्छता आणि श्वसनविकारांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढला आहे.
पालिकेने गेल्या महिन्यात लोखंडी शेड आणि साठवलेले धान्य काढून टाकले होते; मात्र दाणे टाकण्याचे प्रकार सुरूच राहिले होते. परिणामी मनसेसह इतर काही संघटनांनी कबुतरखाना हटवण्याची मागणी तीव्र केली होती. न्यायालयानेही कबुतरखाना हटवण्याचे व दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिकेला दिले होते. त्यानुसार पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे.
कबुतरखाना दादर रेल्वे स्थानकाजवळ असून, तो वाहतुकीसही अडथळा ठरत आहे. त्यामुळे कबुतरखाना हटवण्याची मागणी होत आहे. पालिकेकडून या कबुतरखान्याला वरळी किंवा प्रभादेवीतील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याचा विचार सुरू आहे; मात्र काल (ता. १) कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने पालिकेची कारवाईची अंमलबजावणी स्थगित झाली.
़़़़़़़़़़़़़़़़़
कबुतरखान्याचे स्थलांतर?
कबुतरांची संख्या वाढल्याने येथील घरांच्या खिडक्या, गॅलऱ्यांमध्ये कबुतरांचा वावर वाढला होता. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. त्यामुळे मनसेने या कबुतरखान्याच्या विरोधात आवाज उठवला होता. मनसेकडून २०१७ पासून हा कबुतरखाना हटवण्यासाठी मागणी केली जात आहे. हा कबुतरखाना प्रभादेवीतील कीर्ती महाविद्यालय परिसर किंवा वरळीतील मोकळ्या जागेत हलविण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.