कल्याण अवती-भवती
कल्याण लोकसभेत युवा वर्गासाठी मतदार नोंदणी
कल्याण (वार्ताहर) : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील युवक-युवतींसाठी नवीन मतदार नोंदणी केली होती. त्यानंतर आता मोफत पॅन कार्ड पुरविणाऱ्या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचा प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन सोहळा शनिवारी (ता. २) सकाळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या समोरील मतदार नोंदणी मंडपात पार पडला. कल्याण लोकसभा क्षेत्रातील ही मतदार नोंदणी करणाऱ्यांसाठीची मोफत पॅन कार्ड पुरवणारी योजना १५ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी नऊ ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत डोंबिवलीतील पूर्व आणि पश्चिम येथे विविध ठिकाणी सुरू राहणार आहे. या मतदार नोंदणीच्या ठिकाणी नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील युवक-युवतींसाठी नवीन नाव नोंदणी करणे, नवीन पॅन कार्ड काढणे, तसेच मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांची यादीतील नाव, वय, जन्मतारीख, पत्ता व इतर गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी येणाऱ्या नागरिक बंधू-भगिनींनी खाली दिलेली कागदपत्रे आपल्यासोबत आणावीत. आपले नाव मतदार यादीत यावे, यासाठी नवतरुण- तरुणींनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपली नाव नोंदणी करून घ्यावे, तसेच मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांनी आवश्यक असणाऱ्या दुरुस्ती या योजनेअंतर्गत करून घ्याव्यात, असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.
.........................
स्मारकाभोवती विद्रुपीकरण
कल्याण (वार्ताहर) : मोहने चौकातील आगरी-कोळी स्मारक सध्या केवळ दुर्लक्षित नाही, तर त्या भोवतीच्या परिसरातदेखील अस्वच्छता पसरली आहे. स्मारकाच्या भिंतीवर जाहिराती लावण्यात आल्या आहेत. याचा स्मारकाच्या सौंदर्यावर थेट परिणाम होत असून यामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणाची प्रतिमा मलिन होत आहे.
..................
क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन
कल्याण (वार्ताहर) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीदिनी कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयात रविवारी (ता. ३) शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी सुमीत बोयत व इतर अधिकारी, कर्मचारी यांनीदेखील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
.....................
प्लॅस्टिकमुक्तीसाठी पालिकेचा पुढाकार
कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शनिवारी (ता. २) सायंकाळी सिटी पार्क येथे प्लॅस्टिक बाटल्या नष्ट करणारी मशीन बसविण्यात आली आहे. ही मशीन सीएसआर निधीतून रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी यांनी उपलब्ध करून दिली आहे. याचा एकूण खर्च सुमारे तीन लाख रुपये इतका आहे. या आधी पहिली मशीन आचार्य अत्रे रंगमंदिर येथे बसविण्यात आली होती. या मशीनचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापालिका उपायुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुरेश कल्याणकर, माजी अध्यक्ष प्रसांत पात्रो, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष धीरेंद्र सिंह, माजी अध्यक्ष बिजू उन्नीथन, तसेच रोटरी सदस्य दिलीप घाडगे, रमेश मोरे, दीपक चौधरी आणि डॉ. अर्चना सोमानी उपस्थित होत्या. या मशीनमुळे प्लॅस्टिक बाटल्या योग्य पद्धतीने नष्ट होतील, तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल. हे मशीन सीएसआरच्या माध्यमातून प्राप्त होण्यासाठी पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाच्या रोहिणी लोकरे यांनी पाठपुरावा केला होता. तरी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागातर्फे करण्यात आले आहे.
..........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.