तरुणाईला अमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा डाव : समीर वानखेडे
तरुणाईला अमली पदार्थांचे व्यसन लावण्याचा कट
मिशन नशामुक्त कल्याण कार्यक्रमात समीर वानखेडे यांचे प्रतिपादन
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि वेगाने पावले टाकत आहे; मात्र आपण महासत्ता होऊ नये, यासाठी काही परकीय शक्तींकडून देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला अमली पदार्थांचे व्यसन लावण्याचा कट रचला जात आहे, मात्र तरुणांनी कोणत्याही नशेच्या आहारी न जाता आपल्या देशाला महासत्ता बनवण्यात मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहन नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो मुंबईचे माजी संचालक आयआरएस समीर वानखेडे यांनी कल्याणमध्ये केले. माजी आमदार नरेंद्र पवार आणि हेमलता पवार यांच्या पुढाकाराने कल्याण विकास फाउंडेशन तसेच ॲड. शिवानी कांबळे यांच्या यंग इंडिया कल्याण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन नशामुक्त कल्याण कार्यक्रमात ते बोलत होते.
कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ किंवा ड्रग्ज यातून केवळ आपले शारीरिक, मानसिक नुकसान होत नाही, तर मोठ्या दृष्टिकोनातून आपण विचार केला, तर आपल्याला हे दिसून येईल की आपल्या देशावर, देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचे नकारात्मक परिणाम होत आहेत. आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या २० टक्के जनता ही तरुण आहे. या युवा पिढीकडे देशाला महासत्ता बनवण्यासाठी आवश्यक असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्र्वासही आहे. त्यामुळेच तर काही परकीय शक्तींकडून या तरुण पिढीला आपल्या ध्येयापासून भरकवटण्यासाठी अमली पदार्थांच्या व्यसनात ढकलले जात आहे, अशी चिंता समीर वानखेडे यांनी या वेळी व्यक्त केली. येथील के. सी. गांधी शाळेच्या ऑडिटोरियममध्ये झालेल्या या कार्यक्रमाला कल्याणातील ३०-३५ शाळा महाविद्यालयातील नववी ते तृतीय वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
समीर वानखेडे यांनी या कार्यक्रमात आपल्याकडील बाजारात कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रग्जविक्री होते, त्यांच्याविरोधात कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई केली जाते, एखाद्याकडे ते आढळले, तर कायद्याने काय शिक्षा होऊ शकते आदी प्रमुख मुद्द्यांवरही जनजागृती केली. तसेच विद्यार्थ्यांनी या वेळी अमली पदार्थांसंदर्भात निर्माण झालेले विविध प्रश्नही त्यांना विचारले. ज्यावर समीर वानखेडे यांनी कायदेशीर तरतुदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना उत्तरेही दिली. दरम्यान, तत्पूर्वी कल्याण विकास फाउंडेशनबाबत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी, तर यंग इंडिया कल्याण संस्थेबाबत ॲड. शिवानी कांबळे यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला आयुक्त अभिनव गोयल, माजी आमदार नरेंद्र पवार, हेमलता पवार, ॲड. शिवानी कांबळे, यतीन चाफेकर, मनोहर पालन आदी उपस्थित होते.
हेल्पलाइन क्रमांक
सरकार आणि पोलिस यंत्रणेकडून राज्यभरात अमली पदार्थविक्री करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. इतकेच नाही तर यासाठी सरकारने अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक सक्षमपणे करण्यासाठी १९३३ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. नागरिकांनी अमली पदार्थांबाबत असलेली माहिती या क्रमांकावर कळवल्यास त्यांची माहिती गुप्त ठेवली जाईल, तसेच संबंधितावर कायदेशीर कारवाईही केली जाईल, अशी माहितीही वानखेडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.