
रोहा येथे टाटा संचालित कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी
रोहा, ता. ३ (बातमीदार) : रोहा येथे टाटा समूहाच्या सहकार्याने आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने उभारण्यात येणाऱ्या टाटा संचालित कौशल्यवर्धन केंद्रामुळे रायगड जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. २ ऑगस्ट) या केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या केंद्राचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होणार असून, दरवर्षी तीन हजार विद्यार्थ्यांना येथे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ स्थानिक विद्यार्थ्यांसोबतच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांनाही होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सध्या जगभरात एआय आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे युवकांनी या बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अत्यावश्यक आहे. टाटा समूहाच्या या केंद्रातून मिळणारे प्रशिक्षण रोजगारक्षमतेत वाढ घडवून आणेल. कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, ॲड. राजीव साबळे, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, टाटा टेक्नॉलॉजीजचे प्रकल्पप्रमुख सुशील कुमार जागतिक, प्रीतम गंजेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
......................
लवकरच राज्य विमा कामगार हॉस्पिटल
खासदार सुनील तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, रोहा, महाड आणि रसायनी येथे राज्य विमा कामगार हॉस्पिटल प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले असून, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. याशिवाय, रोहा-अष्टमी नगर परिषद ही एकमेव ब्लड बँक असलेली संस्था असून, तिचे अत्याधुनिकीकरण सुरू आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही या वेळी सांगितले की, टाटा समूहाच्या माध्यमातून रोहा एमआयडीसीसारख्या क्षेत्रात कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी ही आनंदाची बाब आहे. या केंद्रामुळे स्थानिक तरुणांना आपल्या गावीच चांगली नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.