
म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पावरून महायुतीत वाद
विकसकाशी संगनमत केल्याचे आरोप-प्रत्यारोप
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील म्हाडा कॉलनीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि भाजपचे माजी आमदार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय कलगी-तुरा रंगल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे माजी आमदार यांनी शिंदे गटाच्या आमदारावर रहिवाशांची फसवणूक आणि विकसकाशी संगनमत केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी माजी आमदारांनी त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार कपिल पाटील यांच्यावर जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवरील म्हाडा कॉलनी पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू आहे; मात्र १० ते १२ वर्षांचा मोठा कालावधी उलटूनही संबंधित विकसकांनी पात्र रहिवाशांना घरांचा ताबा दिलेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प वादाचा विषय बनला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रहिवाशांच्या बाजूने आवाज उठवत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी हे प्रकरण विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे देत त्यांनी लक्षवेधी मांडली होती.
हे वृत्त कळताच, शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषद घेत तीव्र आक्षेप व्यक्त केला. या वेळी त्यांनी म्हटले, की गृहनिर्माणमंत्र्यांनी विधान परिषदेत या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या काही दिवसांत या मुद्द्यावर एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हाडा कॉलनी पुनर्विकास प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी उपोषण सुरू केले आहे. ते म्हणाले, की नरेंद्र पवार उपोषण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत.
माजी आमदार नरेंद्र पवार यावर उत्तर देताना म्हणाले, की आमदार विश्वनाथ भोईर हे विकसकाच्या बाजूने पत्रकार परिषद आयोजित करीत आहेत. त्यांची जनतेशी बांधिलकी नाही का? जनतेने त्यांना मतदान केले आहे, की विकसकांनी निवडून दिले आहे? ते त्यांची बाजू घेत आहेत. नरेंद्र पवार यांनी केवळ शिवसेना आमदारावर टीका केली नाही, तर त्यांच्याच पक्षाचे माजी खासदार कपिल पाटील यांनी विकसकाशी सहकार्य केल्याचा गंभीर आरोप केला. कपिल पाटील यांनी त्यांच्याशी झालेले मोबाईल संभाषण विश्वनाथ भोईर यांना दिले, जे नंतर समाजमाध्यमावर व्हायरल झाले. त्याचप्रमाणे शिंदे गटातील माजी नगरसेवक रवी पाटील आणि संजय पाटील यांच्या प्रभागातील हा प्रकल्प असून गेल्या १५ वर्षांपासून त्यांनी काय केले, असादेखील प्रश्न उपस्थित केला आहे.
रहिवासी हवालदील
राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. म्हाडा पुनर्वसन प्रकल्पातील बाधित सर्वसामान्य रहिवाशांची अपेक्षा अशी आहे, की कोणीही आम्हाला न्याय मिळवून द्या; पण आमची हक्काची घरे द्या. आमचा झालेला वनवास थांबवा, आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचू. दरम्यान, म्हाडा पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत १,६०० सदनिकाधारकांना वेगवेगळ्या दोन विकसकांकडून घरे मिळणार आहेत. घरे मिळेपर्यंत घरभाडे विकसकांकडून मिळत नाही. तसेच १० ते १२ वर्षे होऊनदेखील घरे मिळत नसल्याने हवालदिल झालेल्यांना त्यांची घरे कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.