उल्हासनगरात पतसंस्थेत घोटाळा
उल्हासनगरात पतसंस्थेत घोटाळा
नऊ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : निव्वळ फायद्याचे स्वप्न दाखवत गुंतवणूकदारांना आर्थिक अंधारात लोटणाऱ्या माय अर्बन नागरी सहकारी पतपेढीचा घोटाळा उघडकीस आला आहे. आकर्षक व्याजदर व हमखास परताव्याचे प्रलोभन दाखवून या पतसंस्थेने गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतपेढीचे अध्यक्ष प्रवीण दर्याणी यांच्यासह एकूण नऊ संचालकांविरोधात शनिवारी (ता. २) विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कल्याणमध्ये राहणारे इलेक्ट्रिशियन ठेकेदार गोपाल रामचंद्र रख्यानी (वय ५३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी व इतर तीन गुंतवणूकदारांनी मिळून एकूण एक कोटी पाच लाख ९५ हजार ४५९ रुपयांची गुंतवणूक ‘माय अर्बन’मध्ये केली होती. २०१८ पासून पतसंस्थेच्या अध्यक्ष प्रवीण दर्याणी व त्यांच्या संचालक मंडळींनी गुंतवणुकीवर मोठा परतावा, वार्षिक व्याज, लाभांशाचे प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांचे मन जिंकले. गोपाल रख्यानी यांच्याकडून ७३ लाख ३१ हजार ४५९ रुपये, तर अन्य तिघांकडून ३२ लाख ६४ हजार रुपये जमा केले; मात्र त्यानंतर ना व्याज, ना मूळ रक्कम, केवळ आश्वासनांची मालिका सुरू राहिली. पैसे मागितल्यावर उलट धमक्या देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न केला.
पैसे परत मागितल्यावर ठेवीधारकांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली. इतकंच नव्हे तर आत्महत्येची धमकी देऊन भावनिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. यामुळे गुंतवणूकदार आणखी घाबरले; मात्र गोपाल रख्यानी यांनी धैर्य दाखवत थेट पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावला आणि अखेर ही फसवणूक चव्हाट्यावर आली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी प्रवीण प्रकाश दर्याणी (अध्यक्ष), अशोक हरचंदानी (सचिव), नियाती दर्याणी (खजिनदार), प्रकाश दर्याणी, नयना दर्याणी, मेहेमोश छायेला, हरीराम खेतवाणी, पुजेश गोंदाने, भास्कर लांगे या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.