खारघरकरांची सुरक्षा वाऱ्यावर
खारघर ता. ३ (बातमीदार) : शहराचा वाढता पसारा पाहाता पोलिसांसमोर विविध आव्हाने उभी ठाकली आहेत. अशातच शहरातील सर्वात गजबलेल्या शिल्प चौकात पोलिसांनी उभारलेल्या चौकीचा उपयोग फेरीवाल्याकडून फळे ठेवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे खारघरकरांची सुरक्षा करणाऱ्या यंत्रणेबद्दलच रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
खारघरमध्ये घरफोडी, मंगळसूत्र चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच गस्तीवरील पोलिसांना विश्रांती मिळावी, यासाठी पोलिसांनी खारघरमधील व्यावसायिक, राजकीय व्यक्तींच्या मदतीने सेक्टर-२० शिल्प चौक, ओवे गावच्या शेजारी चौकी उभारली आहे. विशेष म्हणजे, खारघरमधील सर्वात वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जाणाऱ्या शिल्प चौकातील पोलिस चौकीचा उपयोग फेरीवाले फळे ठेवण्यासाठी केला जात असल्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच चौकीला टाळे नसल्याने रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार घडण्याची भीती वर्तवली जात आहे. काही वर्षांपूर्वी शिल्पचौक येथील पोलिस चौकीत एका फेरीवाल्याने सिलिंडर विक्रीचा प्रकार सुरू होता. त्यामुळे खारघर पोलिस ठाण्याच्या वतीने सोनसाखळी खेचणे, घरफोडी, जबरी चोरी, हत्या, अपघात अशा दैनंदिन घटनांसोबत आगामी येणारे सणासुदीत सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे
--------------------------------
ओवे गावात अशीच परिस्थिती
- खारघर सेक्टर-३० ते ४० सिडको वसाहत तसेच परिसरात असलेल्या ओवेगाव, ओवेकॅम्प, कुटूक बांधन, फारसीपाडा, घोळवाडी, ओवेपेठ आणि रांजणपाडा येथे लाखांहून अधिक नागरिक वास्तव्य करीत आहे. या परिसरात काही गुन्हे घडल्यास नागरिकांना तीन किलोमीटरवरील खारघर पोलिस ठाण्यात जावे लागते.
- १० वर्षांपूर्वी खारघर पोलिसांनी खारघर सेक्टर -३० ओवेगाव आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बललगत पोलिस चौकी सुरू केली, मात्र चौकीकडे पोलिसांनी पाठ फिरवल्यामुळे २९ जुलै रोजी रात्री १०च्या सुमारास पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बी.एम.ज्वेलर्समध्ये चोरांनी प्रवेश करून हवेत गोळीबार करून चोर पसार झाले होते.
---------------------------------------------------
खारघरमधील शिल्प चौक, ओवे पोलिस चौकीची पाहणी करून पुढील उपाययोजना केली जाईल.
- अजय कांबळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खारघर