आईवडिलांकडे राहण्यास जाणे पडले महागात
आई-वडिलांकडे जाणे पडले महागात
चोरट्याने लांबवला ८१ हजारांचा ऐवज
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.३ : मोहरम असल्याने पत्नी मुलीसह आई-वडिलांकडे राहणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्याने सोने-चांदीच्या ऐवजासह रक्कम आणि टीव्ही, मिक्सर, राऊटर आणि कुकर असा ८० हजार आठशे रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली आहे.
मुंब्रा येथे कासिमअली खोजा (वय २४) हे मागील दोन वर्षापासून कुटुंबासह भाड्याने राहत आहेत. मोहरम असल्याने पत्नी मुलीसह ते १८ जुलै रोजी मुंब्रा कसा येथील रॉयल गार्डन सोसायटीत राहणाऱ्या आई-वडिलांकडे राहण्यास गेले होते. २९ जुलै रोजी रियल इस्टेट एजंट आतिफ नामक या तरुणाने त्यांना घराचे लॉक तुटले आहे, असे सांगितले. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.