, उरण तालुक्यातील भात शेती धोक्यात

, उरण तालुक्यातील भात शेती धोक्यात

Published on

शेतकऱ्यांच्या शेतीला खतांचा तुटवडा
उरण तालुक्यातील भातशेती धोक्यात
उरण, ता. ३ (वार्ताहर) ः तालुक्यात भातलावणीची कामे आता संपली असून, खुरपणीला सुरुवात झाली आहे. या पिकांना खतांची आवश्यकता आहे, मात्र उरण तालुक्यात सध्या खतांचा तुटवडा जाणवत आहे. तालुक्यात आणि पनवेलमध्येही कुठेही खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याची दखल कृषी विभागाने घेऊन खतांची उपलब्धता करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
यंदा पावसामुळे या भागातील लावणीला काहीसा उशीर झाला. शेतकऱ्यांनी आपली शेती ओसाड पडू नये या करिता अनेक प्रयत्न करत शेतात रोपे लावली आहे, मात्र या रोपांची वाढ होण्यासाठी खतांची गरज आहे, परंतु तालुक्यात खतांचा तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांनी तिबार लागवड केलेल्या शेतातील रोपांना खतांच्या तुटवड्यामुळे बहर येणार नसल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. त्यामुळे शेती ही धोक्यात आल्याचे दिसून आले आहे, मात्र याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असून, खतांचा पुरवठा करताना दिसून येत नाही.

गुरे नसल्याने पूर्वीसारखे शेतात शेणखत टाकले जात नाही. जास्तीचे पीक येण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला रासायनिक खतांची सवय लावून घेतली आहे आणि आता औद्योगिकीकरणातून वाचलेल्या आणि शिल्लक राहिलेल्या शेतीला खतांची गरज आहे, मात्र तालुक्यात कुठेही खते उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. कृषी विभागाने तालुक्यात लवकरच खते उपलब्ध करावी.
- वसंत म्हात्रे, शेतकरी

तालुक्यातील शेतीला वर्षभरासाठी साधारण ४०० टन एवढ्या खताची गरज असते. सध्या उरण आणि पनवेल तालुक्यात कुठेही खत उपलब्ध नाही. आम्ही कृषी विभागाने आरसीएफकडे खताची मागणी केली आहे, मात्र त्यांनी अद्याप खताचा पुरवठा केला नाही. जिल्हा कृषी विभागाकडून याबाबत पाठपुरावा केला जात असून, लवकरात लवकर शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून दिली जातील.
- अर्चना सूळ, तालुका कृषी अधिकारी

Marathi News Esakal
www.esakal.com