शहापूरची ८० गावे होती मुरबाडमध्ये!

शहापूरची ८० गावे होती मुरबाडमध्ये!

Published on

सुधाकर वाघ : सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. ३ : आज जरी शहापूर व मुरबाड हे ठाणे जिल्ह्यातील दोन स्वतंत्र तालुके असले, तरी १८१८ मध्ये हे दोघेही एकाच प्रशासकीय क्षेत्राचा भाग होते. हे ब्रिटिशकालीन दस्तऐवजांतून स्पष्ट झाले आहे. शहापूर तालुक्यातील सुमारे ८० गावे त्या काळी मुरबाड तालुक्याच्या हद्दीत समाविष्ट होती, असा महत्त्वपूर्ण माहिती इतिहास संशोधक योगेंद्र बांगर यांनी केलेल्या संशोधनातून समोर आली आहे.

योगेंद्र शांताराम बांगर यांनी संपादित केलेल्या ‘मुरबाड : संदर्भ आणि इतिहास’ या ग्रंथात ब्रिटिश कालखंडातील प्रशासकीय बदल, जनगणना आणि दस्तऐवजांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यांनी यामध्ये १८१८-१९ सालच्या उत्तर कोकणातील ब्रिटिश जनगणनेचा संदर्भ दिला आहे. त्या काळातील सीमा रचना उलगडली आहे. आज काळू नदी ही मुरबाड व शहापूर या दोन प्रशासकीय विभागांची नैसर्गिक सीमा बनली आहे. या काळात मेजर टी. बी. जर्विस या ब्रिटिश अधिकाऱ्याने लिहिलेल्या ‘ट्रांजॅक्शन ऑफ द बॉम्बे जिओग्राफिकल सोसायटी’ (ऑगस्ट १८४०) या ग्रंथात आणि मुंबई पुराभिलेखात या संदर्भातील पुरावे उपलब्ध आहेत.
तत्कालीन ब्रिटिश प्रशासनाने १६८० मध्ये मुरबाड तालुक्याचा ५० पानी स्वतंत्र अहवाल तयार केला होता. यात २५२ गावांची सविस्तर नोंद आहे. त्यातील चार गावे इनाम, पाच गावे इजाफत व १५ गावे धर्मादाय संस्थांना दिली होती. उर्वरित २४८ गावे थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत होती. या गावांचे विभाजन महालकरी आणि मामलेदार दोन प्रमुख विभागांत करण्यात आले होते. आजची शहापूर तालुक्यातील किन्हवलीसह ८० गावे मुरबाड तालुक्यात होती. १८६६ मध्ये किन्हवली पेठ मुरबाड तालुक्यातून वगळून ती शहापूर तालुक्यात जोडण्यात आली.
मुरबाडच्या इतिहासाच्या नव्या पानात भर टाकणारी ही माहिती सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरते. नव्या पिढीपर्यंत या माहितीचा प्रसार होणे आवश्यक असून, या संशोधनामुळे परिसराच्या अस्मितेला एक नवा आयाम मिळणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.

................

मुरबाड आणि शहापूर हे आज वेगळे तालुके असले तरी ब्रिटिश कालखंडात एकत्रित प्रशासनाचा भाग होते, याचा ठोस पुरावा ब्रिटिश अहवालांमधून मिळतो. मुरबाडच्या इतिहासात हे एक महत्त्वाचे पान आहे. अनेकांना या गोष्टीची माहिती नव्हती. त्यामुळे या इतिहासाचा शोध घेणे आवश्यक होते.
- योगेंद्र बांगर, इतिहास अभ्यासक
.........................

टोकावडे : शहापूर तालुक्यात असणारा हा ८० गावांचा प्रदेश सुमारे दोनशे वर्षांपूर्वी मुरबाड तालुक्यात होता.

Marathi News Esakal
www.esakal.com