कुपोषणात अडकले बालपण
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ३ : तालुक्यात बालकांच्या कुपोषणाच्या समस्येने चांगलेच डोके वर काढले आहे. ३५ वर्षांपासून बालकांचा कुपोषणाचा प्रश्न सतावत असूनही हे कुपोषण पूर्णतः रोखण्यात ठाणे जिल्ह्याची सरकारी यंत्रणा निष्फळ ठरली आहे. मागील जून महिन्यात घेण्यात आलेल्या नोंदीमध्ये १५ बालके अति तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. तर ४०२ बालके तीव्र कुपोषित आढळल्याची नोंद घेण्यात आली आहे.
शहापूर तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमध्ये आजमितीसही अठराविश्व दारिद्र्य पाहायला मिळत आहे. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत गरजांशी झगडत जीवन जगणाऱ्या आदिवासींच्या हाताला काम नाही. रोजगार उपलब्ध नसल्याने दोन वेळचे पोट भरण्याची भ्रांत असल्यामुळे येथील वाड्या-वस्त्यांमध्ये आरोग्याचा आणि सोबतच बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न अद्यापही कायमचा निकाली निघालेला नाही. बालकांच्या कुपोषणाच्या समूळ उच्चाटनासाठी सरकार स्तरावरून दरवर्षी विविध योजनांची घोषणा करण्यात येते; मात्र या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचत नसल्याने हा प्रश्न अजूनही सतावतच आहे. विशेष म्हणजे, कुपोषणाच्या प्रश्नांवर करावयाचे उपाय आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन तसेच जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. यासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शहापूर तालुक्याच्या आदिवासी, ग्रामीण भागात प्रयत्न होण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.
वैद्यकीय उपचारांची गरज
वाड्या-वस्त्यांमधील सोयीसुविधा कमी पडत असल्यामुळे गर्भावस्थेदरम्यान महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या परिणामस्वरूप कमी वजनाची बालके जन्माला येत आहेत. जन्मानंतरही त्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने ही बालके कुपोषित बनतात. पौष्टिक आहार आणि दर १५ दिवसांच्या आरोग्य तपासणीसोबतच पोषण औषधांचा पुरवठा होण्याची गरज आहे.
अनेक वाड्या-वस्त्या अंगणवाड्याविना
येथील महिला व बालकल्याण यंत्रणा बालकांच्या आरोग्यासाठी अंगणवाड्यांमधून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करते. त्यानंतर वजन व उंचीनुसार कुपोषणाचे वर्गीकरण केले जाते. अंगणवाड्यांमधून बालकांना पौष्टिक आहारही दिला जातो. अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये तर अंगणवाड्याच नाहीत. तेथे पौष्टिक आहार आणि आरोग्य तपासणी मिळणेही दुरापास्त झाले आहे.
उपचारांकडे पाठ
कुपोषित बालकाचे पालक कुपोषणावरील उपचारांसाठी रुग्णालयात हेलपाटे घालण्याचा कंटाळा करतात. रुग्णालयातून दिलेल्या औषधांचाही योग्य वापर करत नाही. वैद्यकीय उपचारांकडे पाठ फिरवत असल्याने ज्या कुटुंबांत कुपोषित बालक आहे. ते कुटुंब कुपोषणाच्या प्रश्नावर मात करू शकलेले नाही.
प्रत्यक्ष वाड्या-वस्त्यांवर भेटी आवश्यक
शहापूर तालुक्यात महिला आणि बालविकास विभागाचे दोन प्रकल्प आहेत. त्यानुसार शहापूर प्रकल्पात २९७, डोळखांब प्रकल्पात २९१ याप्रमाणे तालुक्यात एकूण ५८८ अंगणवाड्या आहेत. तितक्याच सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. त्यांच्याकडून आरोग्य तपासणी करणे आणि पौष्टिक आहार देण्यावर भर दिला जातो. मात्र, तरीही कुपोषण समस्या आटोक्यात येत नाही. फक्त अंगणवाड्यांवरच निर्भर राहणे कामाचे उरलेले नाही. त्यासाठी महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य यंत्रणेने थेट वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन या प्रश्नावर काम करण्याची गरज आहे.
कुपोषित बालकांची आकडेवारी
वर्ष महिना अतितीव्र मध्यम
२०२४ एप्रिल १४ २४३
मे १६ २६३
जून १७ २७४
२०२५ एप्रिल १२ ३१७
मे १५ २३८
जून १५ ४०२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.