भंगारातून साकारली ‘आझाद ट्रेन’
भंगारातून साकारली ‘आझाद ट्रेन’
राणीबागेत पर्यटकांचे ठरतेय आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महापालिकेच्या कार्यशाळेत भंगारातून साकारलेली ऐतिहासिक वाफेच्या इंजिनाची प्रतिकृती ‘आझाद ट्रेन’ सध्या राणीच्या बागेत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली असून, पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे.
सुमारे १२ फूट लांब, १.२५ फूट रुंद आणि १५० किलो वजनाची ही प्रतिकृती, २०२० मध्ये मुंबई सेंट्रल येथील आर. एस. निमकर मार्गावरील महापालिका कार्यशाळेत तयार करण्यात आली होती. हँगिंग गार्डन उद्यानामधील तानसा धरणाच्या प्रतिकृतीजवळ रेल्वेमार्ग दर्शवताना ही ट्रेन ठेवण्याचा प्रारंभिक उद्देश होता, मात्र उद्यानाच्या दुरुस्तीमुळे त्या ठिकाणी ठेवण्याचे नियोजन रखडले आणि आता ही ट्रेन राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षाजवळ ठेवण्यात आली आहे.
या ट्रेनची संकल्पना तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची होती. या अनुषंगाने उद्यानविद्या सहाय्यक सागर डोईफोडे यांनी डिझाइन तयार करून मागणी सादर केली होती. महापालिकेचे बाष्पकार (आर्ट डिझायनर) लक्ष्मीकांत महाडिक यांनी कार्यशाळेतील भंगारातील लोखंडी पत्रे, सळ्या, लाइट फिटिंग, रंग आणि लहान मोटर वापरून ही प्रतिकृती साकारली.
ही प्रतिकृती १९४७ मध्ये भारतीय रेल्वेमध्ये वापरण्यात आलेल्या डब्ल्यू. पी. श्रेणीतील ब्रॉडगेज वाफेच्या इंजिनावर आधारित आहे. स्वातंत्र्याच्या वर्षी वापरात आलेल्या या इंजिनाला ‘आझाद’ नाव देण्यात आले होते. मूळ इंजिन अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील ‘बाल्डवीन लोकमोटिव्ह वर्क्स’ येथे बनवले गेले होते.
ही प्रतिकृती कोणत्याही बाह्य खर्चाशिवाय, महापालिकेच्या कार्यशाळेत उपलब्ध भंगारातून तयार करण्यात आली आहे. सुमारे सहा महिन्यांत ही निर्मिती पूर्ण झाली असून, ती महापालिकेच्या कारागिरांची कल्पकता आणि मेहनतीचे उदाहरण मानली जात आहे.
माझ्या सेवानिवृत्तीपूर्वी ही कलाकृती पूर्ण करून मुंबईकरांना भेट देता आली, याचा मला विशेष आनंद आहे. मुंबईकरांसाठी दर्जेदार व आकर्षक कलाकृती निर्माण करणे हाच या प्रयत्नामागचा हेतू होता. ‘आझाद ट्रेन’ ही केवळ लोखंड आणि पोलादी रचना नाही, तर ती मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला साजेसे कलात्मक दर्शन आहे. ही प्रतिकृती भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
– लक्ष्मीकांत महाडिक, बाष्पकार, महापालिका कार्यशाळा
ही जुनी रेल्वेगाडी सध्या पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. अनेक पर्यटक या प्रतिकृतीसमोर फोटो आणि सेल्फी घेतात व ही आठवण जपतात. त्यामुळे ‘आझाद ट्रेन’ ही राणीच्या बागेतच कायमस्वरूपी ठेवण्याचा आमचा मनोदय आहे.
– जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक
या ऐतिहासिक प्रतिकृतीमागील संकल्पना ही केवळ देखाव्यासाठी नव्हती, तर मुंबईच्या जलप्रणालीचा, वारशाचा आणि अभिमानाचा भाग लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न होता. आज ती राणीबागेत पाहिल्यावर समाधान वाटतं.
– सागर डोईफोडे, उद्यानविद्या सहाय्यक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.