मृत्यूच्या दारातून परत मायेच्या कुशीत
पाठलाग...
मृत्यूच्या दारातून परत मायेच्या कुशीत
नवनीत बऱ्हाटे, उल्हासनगर
बकरपूर हे बिहारच्या नकाशावर असलेले एक गाव आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली असलेले हे गाव पोलिसांसाठीही वर्ज्य क्षेत्र मानले जाते. तिथे प्रवेश करणे म्हणजे जिवाशी खेळ करण्यासारखे समजले जाते. पण, आईचे हृदय मुलाच्या काळजीने जेव्हा धडधडते, तेव्हा मात्र पोलिस दलाला भीतीची भाषा कळत नाही. अशा स्थितीत उल्हासनगरमधून पोलिस पथक बिहारला गेले. जिथे वाहनचालकही जायला तयार नव्हते, तिथे त्यांनी दुप्पट भाडे दिले. पोलिस पोहोचताच गावभर गडबड सुरू झाली. शंभरहून अधिक ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घातला. हवेत तणावाचे दाट धूर होते. त्यांना ना धमकीने रोखता आले, ना गर्दीच्या भीतीने. अखेर पोलिसांनी फिल्मीस्टाईलने आरोपी महिलेला ताब्यात घेत बाळाला आपल्या मायेच्या कुशीत परत आणले.
-------------------------------------
मीना सोनवणे (३५) या उल्हासनगरच्या म्हारळगाव येथे सासू, पती आणि पाच मुलांसह राहतात. तिचा सर्वांत लहान पाच महिन्यांचा मुलगा कार्तिक आजाराने त्रस्त होता. गरिबीमुळे मीना त्याच्यावर उपचार करू शकली नाही, म्हणून तिने रुग्णालयाचा अहवाल आणि मुलाचा फोटो समाजमाध्यमांवर पोस्ट केला आणि लोकांना मदतीसाठी आवाहन केले. मुंबईतील बोरिवली येथे राहणाऱ्या स्वाती बेहरा या महिलेने मदतीचा हात पुढे केला आणि मीनाला भेटण्यासाठी मुंबईहून उल्हासनगरला आली. मदतीच्या नावाखाली तिने हैदराबाद येथे राहणारी तिची मैत्रिणी कृष्णा सुरक्षावेणी हिच्याशी बोलून सांगितले की, हैदराबादमध्ये एक चांगला बालरोगतज्ज्ञ आहे. तेथे स्वस्तात उपचार केले जातील. मीनाने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि आजारी मुलासह पती सुनीलसोबत तिथे गेली. त्यांची आणि कृष्णाची भेट झाली. कृष्णा म्हणाली, येथे एक डॉक्टर आहे जो कमी खर्चात मुलाला बरा करेल. त्यानंतर मीना आणि सुनीलला हॉटेलमध्ये राहायला लावले आणि दुसऱ्या दिवशी मुलाला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी अहवाल पाहिला आणि म्हणाले, मुलाला बरे करण्यासाठी एक महिना लागेल. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मीना यांनी पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली. मदतीच्या नावाखाली त्यांनी उपचार घेण्याचे मान्य केले. मात्र, मुलाला एक महिना हैदराबादमध्ये राहावे लागेल, असे त्यांनी सांगितले. आपल्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेण्यासाठी मीना दोन दिवसांनी पुन्हा मुंबईला रवाना झाली. दरम्यान, व्हिडिओ कॉलिंगद्वारे ती आपल्या मुलाच्या संपर्कात राहिली.
महिनाभरानंतर मीनाने त्यांना मूल परत करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी, मी दोन लाख रुपये वैद्यकीय उपचारासाठी खर्च केले आहेत, ते आधी द्या. मग मी मुलाला तुमच्या ताब्यात देईन. मीना यांनी अनेकदा विनंती करूनही मूल परत करण्यास तयार नव्हते. नंतर त्यांनी फोनही बंद केले. हतबल झालेल्या आईने अखेर पोलिसांना हाक दिली. मीनाने स्वाती आणि कृष्णा यांच्याविरोधात उल्हासनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिस उपायुक्त आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांचे पथक हैदराबादला रवाना झाले. कृष्णाला मदत करणाऱ्या सोनीदेवी पासवान हिला तेथून अटक केली; मात्र अन्य आरोपी तेथून मुलाला घेऊन पळून गेले होते.
सोनीदेवी पोलिस कोठडीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की माला देवी (२४) ही महिला बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील बकरपूर गावात अपहरण झालेल्या मुलासोबत आहे. भागलपूर हा नक्षलग्रस्त भाग असल्याने उल्हासनगर पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार पाच जणांचे पथक बिहारला रवाना झाले. या भागात जाण्यासाठी एकही वाहनचालक तयार नव्हते. अखेर उल्हासनगर पोलिसांनी दुप्पट भाडे देऊन जीव धोक्यात घालण्याचे ठरवले. बकरपूर आणि पीरपथी दोन्ही गावांत गुन्हेगारीचा थर आहे. याच गावांच्या मध्यभागी आरोपी महिला लपून बसली होती. उल्हासनगरच्या पोलिसांनी मोठ्या सतर्कतेने स्थानिक पोलिसांच्या मदतीने गावात पोहोचले. शेकडो ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला होता. धमकी देण्यास सुरुवात केली; मात्र आईच्या मायेची आठवण काढत त्यांनी न घाबरता आरोपी महिलेला अटक केली. उल्हासनगर पोलिसांनी पाच महिन्यांच्या चिमुरड्याला ताब्यात घेतले.
===============================
शेकडो लोकांचा पोलिसांनाचा घेराव
आरोपी महिला मुलाला घेऊन नक्षलवाद्यांचा परिसर असलेल्या बकरपूर गावात गेली होती. गावाचे नाव ऐकल्यावर एकही वाहनचालक तिकडे जायला तयार नव्हता. त्यासाठी दुप्पट भाडे मोजावे लागले. बकरपूर गावात जाण्यासाठी आणि महिला आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांना पीरपथी गावातून जावे लागले. दोन्ही भागातील लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. पोलिस महिलेला ताब्यात घेण्यासाठी गेले असता गावातील शेकडो लोकांनी पोलिसांना घेराव घातला होता. मोठ्या कष्टानंतर पोलिसांना तिला ताब्यात घेण्यात यश आले, असे बिहारमध्ये कारवाईसाठी गेलेल्या महिला पोलिस अधिकारी निकिता भोईगड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.