गणपतीनंतर परीक्षा, दिवाळीत नियुक्तीपत्र
गणपतीनंतर परीक्षा, दिवाळीत नियुक्तिपत्र
ठाणे पालिकेतील मेगाभरती मार्गी लागणार; १७७० पदांसाठी लवकरच जाहिरात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : दोन वर्षांपूर्वी मान्यता मिळूनही रखडलेली ठाणे महापालिकेतील १,७७० कर्मचारी पदांची मेगाभरती अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या भरतीसाठी पालिका प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. त्यामुळे गणपतीनंतर थेट परीक्षा होणार आहे, तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने नियुक्तिपत्र देत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात येणार आहे. पदभरती एक हजार ७७० असली तरी त्यासाठी लाखोंनी अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही सर्व भरती प्रक्रिया कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पार पाडण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची मदत घेतली जाणार आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्रातील सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे ठाणे पालिकेतील रिक्त पदांची भरती करण्यासही हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या चार हजार ५०० रिक्त जागांपैकी १७३८ जागा भरल्या जाणार होत्या; मात्र हा अध्यादेश निघाल्यानंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदेही रिक्त झाल्याने ठाणे महापालिकेने आता एक हजार ७७० पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक भरती ही आरोग्य विभागात होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी, अग्निशमन दलात कर्मचारी भरती होणार आहे.
भरती प्रक्रिया लवकर मार्गी लागावी, यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, पण मध्यंतरी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे सहा महिने भरती रखडली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, पण त्याआधी ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भरतीसंदर्भात जाहिरात वर्तमानपत्रे आणि पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. गणपतीनंतर थेट परीक्षा होऊन दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने नवीन कर्मचाऱ्यांना रुजू करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या अस्थापनेवर काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना ही सुवर्णसंधी असणार आहे.
अशी राबवणार प्रक्रिया
भरती प्रक्रिया राबविण्यात येत असताना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये, यासाठी खासगी संस्थेकडे ही प्रक्रिया सोपविण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेतील भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सीमार्फत राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार आहेत. ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे; मात्र मुलाखती घेतल्या जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. त्या-त्या पदाकरिता उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर त्याची छाननीदेखील टाटा कन्सल्टन्सी करणार असल्याने या भरती प्रक्रियेत ठाणे महापालिकेतील अधिकारी, माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना हस्तक्षेप करता येणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पालिकेला ‘कारकून’ नकोत
ठाणे महापालिकेने आधी लिपिकसाठी ३०० पदांची भरती जाहीर केली होती, पण आता १७७० कर्मचाऱ्याच्या मेगाभरतीमध्ये ‘कारकून’ म्हणजेच लिपिक जागा नसेल. सफाई कर्मचाऱ्याच्या वारसा हक्काने लागणाऱ्या शिक्षित तरुणांना आणि वाहनचालकांना पालिकेने लिपिकपदावर भरती केली आहे. लिपिकपदांचा कोटा भरला असल्याने आता या पदासाठी भरती होणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत सर्वाधिक लिपिकपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचा हिरमोड होणार आहे.
कुठे किती पदे
पालिकेत कार्यकारी अभियंत्यांची पाच पदे, उपनगर अभियंत्यांची सात पदे, कनिष्ठ अभियंत्यांची (नागरी) ७७ आणि कनिष्ट अभियंत्यांची ६६ अशी १६५ पदे रिक्त आहेत.
आतापर्यंत ६८ पदे भरली गेली आहेत; मात्र ३८२ रिक्त पदांवर भरती होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात १८० फायरमन कायमस्वरूपी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आरोग्य विभागात २५० परिचारिका, सुमारे ८०० वैद्यकीय अधिकारीपदे भरण्यात येणार आहेत. या विभागात सर्वाधिक पदांची भरती होणार आहे. याशिवाय प्रदूषण विभागातीलही रिक्त पदे भरली जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.