वेगाचा अतिरेक महागात

वेगाचा अतिरेक महागात

Published on

वेगाचा अतिरेक महागात
वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; ६९ लाखांचा दंड वसूल
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) ः पावसाळा सुरू होताच रायगड जिल्ह्यात पर्यटकांची वर्दळ वाढते. विशेषतः तरुणाई मोठ्या संख्येने निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल होते, मात्र या वातावरणात वेगाचा मोह आवरत नसल्याने वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशा बेदरकार वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी रायगड वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ९ ते ३१ जुलैदरम्यान एकूण सहा हजार ५६६ चालकांवर कारवाई करत तब्बल ६९ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
एका दुचाकीवरून तिघांनी प्रवास करणे, वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, यामुळे अनेकदा वाहनचालक स्वतःसह इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करतात. त्यातच जिल्ह्यात असणारे खड्डेमय रस्ते, पावसामुळे ठिकठिकाणी साचलेले पाणी यामुळे अतिवेगाने वाहने चालविल्याने अपघाताचा धोका आणखी वाढतो. यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्या तसेच अवैधरित्या वाहतुकीला अडथळे निर्माण होईल अशाप्रकारे वाहने पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. ९ ते ३१ जुलैपर्यंत तब्बल सहा हजार ५६६ चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून पोलिसांनी ६९ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.
.............
चैकट :
एकूण दंड वसूल - ६९ लाख ५२ हजार ७०० रु.
वाहनचालकांची संख्या - सहा हजार ५६६ चालक
कारवाईचा कालावधी - ९ ते ३१ जुलै
.............
चैकट :
वाहतूक नियम उल्लंघनाची कारणे :
- तरुणांमध्ये अतिवेगाचे आकर्षण
- अल्पवयीन वाहनचालकांचे वाढते प्रमाण
- वाहतूक नियमांबाबत जनजागृतीचा अभाव
..............
चैकट :
शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती :
रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांच्या वतीने प्रत्येक आठवड्यात जिल्ह्यातील दोन शाळा अथवा महाविद्यालयांमध्ये वाहतुकीचे नियम, रस्ते अपघात, प्रत्येक नियमाचे उल्लंघन केल्यावर दंड व शिक्षेचे स्वरूप याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होऊन वाहन चालविताना नियमांचे पालन करण्यात येत आहे.
............
कोट
सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अतिवेगाने वाहने चालविणे. यामुळे आपण आपल्यासोबतच इतरांचाही जीव धोक्यात घलत आहोत, याची जाणीवच वाहनचालकांना नसते. यासाठीच आम्ही वेळोवेळी अशी दंडात्मक कारवाई करून वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती निर्माण करीत आहोत. यासाठी शहरासह राज्यमार्ग, शाळा, महाविद्यालयांच्या ठिकाणीही वाहतूक पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत.
- अभिजित भुजबळ, जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com