रुग्णालयांच्या दारात आजारांचे मार्ग

रुग्णालयांच्या दारात आजारांचे मार्ग

Published on

रुग्णालयांच्या दारात आजारांचे मार्ग
आजार पसारविणाऱ्या खाद्य पदार्थांची सर्रास होतेय विक्री
ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) ः ठाण्यातील बहुतांश रुग्णालयांचे परिसर विविध आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. रुग्णालयांच्या ठिकाणी खाद्य पदार्थांच्या स्टॉलचा अनधिकृत बाजाराच भरलेला दिसतो. त्यामुळे ही रुग्णालये आजारांवर उपचार करणारी ठिकाणे म्हणून ओळखली जात असली तरी त्यासोबतच ती आजार पसरविणारे हब देखील ठरू लागली आहेत.
ठाणे पालिकेच्या हद्दीतील रुग्णालयांचे परिसर मात्र अस्वच्छ खाद्य पदार्थांच्या माध्यमातून आजारांचा प्रसार करणारे ठरत आहेत. हे चित्र केवळ ठाण्यातील शासकीय रुग्णालय परिसरातच विकले जातात असे नव्हे, तर ते ठाण्यातील इतर अनेक खासगी रुग्णालयांच्या परिसरात देखील सर्रासपणे विकले जात आहेत. यातील बहुतांश स्टॉल्स, हॉटेलवाल्यांकडे खाद्य पदार्थ विक्रीचे परवाने देखील नाहीत. अनधिकृतपणे येथील अस्वच्छ जागेत, गटारांवर ते उघड्यावर विकले जात आहेत. खाद्य पदार्थांच्या स्टॉल शेजारी कचऱ्याचे ढीग, घाण पाणी, चिखल पसरलेले आहे. अशा ठिकाणचे पदार्थ खाल्ल्यानंतर जीवघेणे आजार होण्याचा धोका आहे. केवळ खाद्य पदार्थ्यांचे स्टॉलच नव्हे तर जास्त पिकलेली फळे, अस्वच्छ पाण्यापासून तयार केलेल्या चहाची येथे विक्री होत आहे. त्यामुळे रुग्णालयांचे परिसर निकृष्ट, अस्वच्छ खाद्य पदार्थांच्या माध्यमातून घातक आजारांचा प्रसार करणारी ठिकाणे बनली आहेत.
अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी मोफत जेवण पुरवले जाते. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा संस्थेच्या मदतीने दुपारचे जेवण दिले जाते. मात्र, या जेवणाची ठराविक वेळ असल्याने अनेकांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या घाणेरड्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर भूक भगवावी लागते. असे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे जुलबापासून कर्करोगापर्यंतच्या आजार होत असल्याचे आहार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com