थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

Published on

‘सफाई अपनाओ - बिमारी भगाओ’ मोहिमेंतर्गत जनजागृती
नेरूळ, ता. ३ (बातमीदार)ः डेंगी, मलेरिया व चिकुनगुनिया यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने ‘सफाई अपनाओ - बिमारी भगाओ’ ही जनजागृती मोहीम राबवली आहे. ही मोहीम २५ एप्रिल २०२५पासून सुरू करण्यात आली असून, तिचा समारोप नुकताच गुरुवारी (ता. ३१) करण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत नवी मुंबईतील २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी एक अशा एकूण २६ ठिकाणी विशेष जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांना एकूण ११,२५९ नागरिकांनी भेट दिली. यातून ७३२ नागरिकांची रक्ततपासणी करण्यात आली. याशिवाय ३६४ ठिकाणी जागोजागी जनजागृती शिबिरे घेण्यात आली असून त्यामध्ये १,४६,१२४ नागरिक सहभागी झाले. या मोहिमेदरम्यान डासांची ओळख, त्यांच्या वाढीची ठिकाणे, घरगुती उपाय, पाण्याचे साचणे कसे टाळावे, यावर सविस्तर माहिती देण्यात आली. टायर, प्लॅस्टिक डब्बे, पाण्याचे टँक, कूलर या वस्तूंमध्ये डासांची पैदास होते, हे दाखवण्यासाठी प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. शाळांतील १७,६८३ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या माध्यमातून कुटुंबस्तरावरही जागरूकता पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पडली. त्यांनी नागरिकांना पाण्याची साठवण टाळा, झाकणे वापरा आणि घरे व परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन केले.
......................
सिंधुदुर्ग संघाच्या वृक्षारोपण उपक्रमास प्रतिसाद
पनवेल (बातमीदार) : सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्षारोपण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी इच्छापूर्ती गणेश मंदिर (एसटी स्थानकामागे) परिसरात १०० देशी वृक्षांचे (बहावा, कांचन) रोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर आणि विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी उपस्थिती लावून कार्यकर्त्यांना प्रेरित केले. आमदार ठाकूर यांनी संघाच्या उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले, की सिंधुदुर्ग मंडळ समाजसेवा आणि पर्यावरण रक्षणाच्या कार्यात अग्रेसर आहे. त्यांनी या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. मंडळाने आतापर्यंत ६५० हून अधिक वृक्षांची लागवड केली असून त्यांच्या संवर्धनावरही लक्ष दिले आहे. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष केशव राणे यांनी केले. सचिव रामचंद्र मोचेमाडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास सल्लागार मंगेश अपराज, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रिया खोबरेकर, तसेच अनेक महिला व युवक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..................
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सकारात्मक पावले
पनवेल (बातमीदार) : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने पनवेल महापालिकेने यंदाही मूर्तिकारांना शाडू मातीचे मोफत वाटप केले. यावर्षी ३४ टन शाडू माती २४ पेक्षा अधिक मूर्तिकारांना वितरित करण्यात आली. या उपक्रमामुळे मूर्तिकारांना नैसर्गिक साहित्य वापरण्याचे प्रोत्साहन मिळाले असून, पर्यावरण संरक्षणाला हातभार लागत आहे. कळंबोली प्रभागात सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्या हस्ते मूर्तिकारांना शाडू माती वाटप करण्यात आले. या वेळी त्यांनी मूर्तिकारांशी संवाद साधत पारंपरिक, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे आवाहन केले. उप आयुक्त स्वरूप खारगे यांनी सांगितले, की अधिकाधिक पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. या वेळी प्रभागप्रमुख मनोज चव्हाण, मूर्तिकार अरुण पाटील, सदाशिव कुंभार व इतर कर्मचारी उपस्थित होते.
................
खड्डेमय रस्त्याविरोधात शिवसेना आक्रमक
खारघर (बातमीदार) : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांचे निकृष्ट डांबरीकरण आणि त्यानंतरच्या पावसात डांबर वाहून गेल्याने रस्ते अक्षरशः खड्ड्यांनी भरले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांमध्ये रोपे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवासेना सदस्य सहभागी झाले. महानगरप्रमुख अवचित राऊत यांनी खड्डे लवकर बुजवले नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
...................
खारघर सेक्टर १२ मार्गावरील बससेवा सुरू करण्याची मागणी
खारघर (बातमीदार) : खारघर सेक्टर १२मार्गे जलवायू विहारकडे धावणारी एनएमएमटी बससेवा काही काळ बंद होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर मनसेचे सूरज पाटील यांनी वाहतूक शाखेकडे पत्रव्यवहार केला. त्यास प्रतिसाद देत वाहतूक उपनिरीक्षक भरत थिटे यांनी शंभराहून अधिक अडथळे निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी आणि बसच्या अनुपस्थितीमुळे प्रवाशांना पर्यायी बसथांब्यांपर्यंत जावे लागते. वाहतूक शाखेने आता नवी मुंबई महापालिकेकडे बससेवा पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. या मार्गावर पूर्वी नियमित बससेवा सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com