अवयवांच्या प्रत्यक्ष हजारो रुग्ण : डॉ. कैलास पवार

अवयवांच्या प्रत्यक्ष हजारो रुग्ण : डॉ. कैलास पवार

Published on

अवयवांच्या प्रत्यक्ष हजारो रुग्ण : डॉ. कैलास पवार
ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) ः अवयवदानामध्ये समाजाचा सहभाग वाढवण्याची गरज आहे. सध्या विविध अवयवांच्या प्रतीक्षा यादीत हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक अवयवदानाचे मूल्य अमूल्य आहे, त्याकरिता या जगात आपणाला मृत्यूनंतरही जिवंत राहायचे असेल, तर प्रत्येकाने अवयवदान करायला पाहिजे, असे आवाहन ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यात ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अवयवदान पंधरवडा चळवळ राबवली जात आहे. त्याचा प्रारंभ रविवारी (ता. ३) ठाण्यातून करण्यात आला.
अवयवदान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मृत्यूनंतर ते नष्ट करण्यापेक्षा ते रुग्णालयांना दान करून उपयोगात आणले, तर ते पुण्याचे काम होईल. एखाद्या रुग्णांच्या शरीरात आपण मृत्यूनंतरही जिवंत राहू शकतो. त्या रुग्णाला डोळे, यकृत, किडनी, हृदय यांसारख्या अवयवाच्या माध्यमातून जीवनदान मिळू शकते. म्हणूनच अवयव दान हे जगातील सर्वात श्रेष्ठ असून, त्यासाठी जास्तीत-जास्त लोकांनी पुढे यायला पाहिजे. आज विविध रुग्णालयात हजारोच्या संख्येने रुग्णांना विविध अवयवांची प्रतीक्षा आहे, असे सांगून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशनुसार ठाणे जिल्ह्यात याबाबत जनजागृती केली जाईल, असे पवार म्हणाले.
या अभियानांतर्गत पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य, ऑनलाइन व्याख्यान, आरोग्यविषयक सत्र, सोशल मीडियावरील जनजागृती, ओपीडीमध्ये क्यूआर कोडद्वारे, प्रतिज्ञा रजिस्ट्रेशन आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या वेळी कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे, डॉ. मृणाल राहूड, दंत शल्य चिकित्सक डॉ. अर्चना पवार, समाजसेवक श्रीरंग सिद आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो :
अवयवदान जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शल्यचिकित्स्क डॉ. कैलास पवार आणि इतर मान्यवर..

Marathi News Esakal
www.esakal.com