मैत्रिणीला सिगरेटचे चटके देऊन मारहाण
मैत्रिणीला सिगारेटचे चटके देऊन मारहाण
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : मैत्रीचे संबंध तोडल्याच्या रागातून एका तरुणाने त्याच्या मैत्रिणीला शिवीगाळ करीत सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. आरोपीने तरुणीच्या पायाला सिगारेटचा चटका देत तिला गंभीर दुखापत केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी २३ वर्षांची आहे. आरोपी अमित भगवान वीर (वय २५, रा. खालची पेठ, इगतपुरी) याने पीडित तरुणीसोबत बोलणे सुरू ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला; मात्र तिने नकार दिल्याने अमित संतापला. त्याने २४ जुलैला सायंकाळी सात वाजता अत्यंत वर्दळ समजल्या जाणाऱ्या सी ब्लॉक, गुरुद्वारासमोरील गल्लीत ही घटना घडली. आरोपी अमितने तरुणीला शिवीगाळ करत धमकावले. रागाच्या भरात त्याने आपल्या हातातील सिगारेटने तिच्या पायाच्या मांडीजवळ चटका दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्या मानेला दाबून हाताने मारहाण केली. तसेच पोटावर ठोसे मारून तिला जखमी केले. शनिवारी (ता. २) पीडित तरुणीने या घटनेची तक्रार उल्हासनगर पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी आरोपी अमित वीर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर माळी करीत आहेत.