सनातनी दहशतवाद विसरता येणार नाही

सनातनी दहशतवाद विसरता येणार नाही

Published on

सनातनी दहशतवाद विसरता येणार नाही
आमदार जितेंद्र आव्हाड यांची वादग्रस्त टिप्पणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या ‘सनातनी दहशतवाद’ उल्लेखावरून वाद निर्माण झाला असतानाच आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, सनातनी दहशतवाद हा हजारो वर्षांपासून अस्तित्वात होता आणि पुढील हजारो वर्षे अस्तित्वात राहील. जोपर्यंत वर्णव्यवस्था आहे तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरता येणार नाही, अशी टिप्पणी रविवारी (ता. ३) केली.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष सुटका झाल्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘भगवा दहशतवाद’ नव्हे तर ‘सनातनी दहशतवाद’ असे म्हणायला हवे, असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड उभे राहिले असून आपली भूमिका त्यांनी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मांडली. त्याआधी त्यांनी समाजमाध्यमांवरही आपली पोस्ट लिहिली असून त्यामुळे नवीन वादंग निर्माण झाला आहे. सनातनी दहशतवाद हा प्राचीन काळापासून असून त्याचे अस्तित्व मानावेच लागेल, असे आव्हाड म्हणाले. आपली भूमिका मांडताना त्यांनी भगवान बुद्धांपासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा सर्व इतिहास सांगितला. भगवान बुद्धांना छळणारे, बौद्ध भिक्खूंना, बसेश्वर, चार्वाकाला मारणारे सनातनी होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे, संत तुकारामांची गाथा बुडवणारे सनातनी होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट करणारे सनातनी दहशतवादी होते, असा दावा आव्हाड यांनी केला.

गोट्या गित्तेकडून धमक्या
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपी गोट्या गित्ते याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा इशारा देताना गित्ते याने जितेंद्र आव्हाड यांनी माझ्यावरील आरोप थांबवावे, असा इशारा दिला. यावर आव्हाड यांनी, गोट्या गित्ते गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला धमकी देत असल्याची माहिती पत्रकारांना दिली. तो वाल्मीकी कराडचा उजवा हात असून बापू आंधळे खून प्रकरणातही त्याचा सहभाग होता. गित्ते हा नामचीन गुंड असून महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार होता, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com