कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

केडीएमसीतर्फे बायोक्रक्स वेंडिंग मशीनचे लोकार्पण
डोंबिवली (बातमीदार) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण विभागाने प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. कल्याणच्या सिटी पार्क येथे दुसरी बायोक्रक्स रिव्हर्स वेंडिंग मशीन बसवण्यात आली असून, हे मशीन प्लॅस्टिकच्या बाटल्या नष्ट करण्याचे कार्य करते. या उपक्रमासाठी आवश्यक मशीन रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी यांच्यातर्फे सीएसआर निधीतून उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. याआधी पहिली मशीन आचार्य अत्रे रंगमंदिर येथे बसवण्यात आले होते. या नवीन मशीनचे लोकार्पण महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संजय जाधव, रोहिणी लोकरे, सुरेश कल्याणकर, प्रशांत पात्रो, धीरेंद्र सिंह, माजी अध्यक्ष बिजू उन्नीथन, दिलीप घाडगे, रमेश मोरे, दीपक चौधरी आणि डॉ. अर्चना सोमानी आदी मान्यवर उपस्थित होते.
...........................
डोंबिवलीच्या तरुणाईची जागतिक पातळीवरील झेप
कल्याण (वार्ताहर) : जपानमधील कावासाकी शहरात २७ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान पार पडलेल्या जागतिक जम्प रोप (दोरी उड्या) स्पर्धेत डोंबिवलीच्या तरुण खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत महाराष्ट्राच्या संघाला एकूण १६ पदकांची कमाई करून दिली. या स्पर्धेत ३६ देशांतील २,६०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र टीमने दोन सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदके मिळवली. विशेष म्हणजे या यशस्वी संघातील बहुतेक खेळाडू डोंबिवलीचे आहेत आणि त्यांनी कोणतीही सरकारी किंवा खासगी मदत न घेता स्वतःच्या खर्चाने ही स्पर्धा गाजवली. भूमिका नेमाडे (१ सुवर्ण), एशान पुथ्रन (१ सुवर्ण, १ रौप्य), तन्वी नेमाडे (२ रौप्य, १ कांस्य), नमन गंगवाल-नाशिक (२ रौप्य, १ कांस्य), अमन वर्मा (१ रौप्य, १ कांस्य), मानस मुंगी (१ रौप्य, १ कांस्य), रोनक साळवे (१ रौप्य), पारोल झंकार आणि पद्माक्षी मोकाशी (प्रत्येकी १ कांस्य) ही पदके १६-१८ व १९+ वयोगटात एकेरी, दुहेरी, तिहेरी आणि मिश्र प्रकारांत मिळवण्यात आली आहेत. प्रशिक्षक अमन वर्मा यांनी गेली अनेक वर्षे शाळा-कॉलेजांमधून प्रशिक्षण देत ही टीम घडवली आहे. हा विजयी संघ सोमवारी मध्यरात्री मुंबई विमानतळावर पोहोचणार असून, त्यांचे जोरदार स्वागत होणार आहे. समाजातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
...........................
भाजपच्या मंडळ उपाध्यक्षपदी वैशाली परदेशी
डोंबिवली (बातमीदार) : भारतीय जनता पक्षाच्या कल्याण (रामबाग) मंडळाच्या उपाध्यक्षपदी वैशाली परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या भाजप कल्याण शहर महिला मोर्चाच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत होत्या. पक्षात गेल्या पाच वर्षांपासून सक्रिय सहभाग असलेल्या वैशाली परदेशी यांनी विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या निवडीमुळे स्थानिक स्तरावर त्यांचे अभिनंदन होत असून, पक्ष संघटनेत नवचैतन्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
.......................
श्री राम सेवा मंडळातर्फे शिव कावड यात्रेचे आयोजन
कल्याण (वार्ताहर) : श्री राम सेवा मंडळ, कल्याण शहराच्या वतीने भव्य शिव कावड यात्रा आयोजित करण्यात आली. ही यात्रा श्री कृष्णनगर येथील शिवमंदिर येथून सुरू होऊन, अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात समारोप करण्यात आला. मार्गामध्ये धर्मवीर संभाजी महाराज चौक, चक्की नाका, कोळसेवाडी पोलिस स्टेशन, श्रीराम चौक, नेताजी चौक, कैलास कॉलनी या प्रमुख ठिकाणी शिवभक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. बजरंग दल, जिल्हा संयोजक राजन चौधरी व भाजप महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष अतिश चौधरी, उपाध्यक्ष जितू गुप्ता, खजिनदार लालजी दुबे, सचिव राजू वाकोडे यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली. यात्रेत आमदार सुलभा गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर तसेच समाजसेवक संदीप व सोनी क्षीरसागर यांच्यासह हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. यात्रेदरम्यान भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळाले.
.........................
बाळू रायते यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव
कल्याण : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते बाळू रायते यांना ‘भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवनगौरव व समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुण्यातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याला तुकाराम बाबा महाराज (संत बागडे बाबा आश्रम, जत), पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त वैशाली मार्तंड चव्हाण, पुणे अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीराम मांडुरके, रील स्टार प्राजक्ता मालुंजकर, श्वेता परदेशी व ममता भोई यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com