गाडी हाकायची असेल तर नियम पाळा
गाडी हाकायची असेल तर नियम पाळा
ठाणे आरटीओने केले सात हजार वाहनांचे परवाने निलंबित
ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) ः वाहनचालकांची बेफिकिरी आता फक्त दंडापुरती मर्यादित राहिलेली नाही. अपघात घडवणाऱ्या व नियम पाळण्यात कुचराई करणाऱ्या वाहनचालकांना आता थेट वाहन परवाना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. पाच वर्षांत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल सात हजार वाहनांवर अशा प्रकारची कारवाई केली असल्याने वाहतुकीच्या नियमांना डावलणे वाहनमालकांना चांगलेच महागात पडले आहे.
अनेकदा वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने चालवले जाते. अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते, परंतु नियम मोडणाऱ्यांचे वाढते प्रमाण पाहता वाहतूक विभागानेदेखील कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारच्या वाहनांवर थेट वाहन परवाना निलंबित करण्याचे पाऊल उचलले जात आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) आतापर्यंत सात हजार वाहनांचे वाहतूक परवाने निलंबित केले आहेत.
कोणाचे परवाने होतात निलंबित
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, गतीच्या नियमांचे उल्लंघन करणे, अवजड वाहनात क्षमतेपेक्षा अधिक माल भरून त्याची वाहतूक करणे आदी नियम मोडणाऱ्या वाहनांवर वाहन परवाना निलंबित कारण्याची कारवाई केली जाते.
कशी होते कारवाई :
वाहनचालकाने नियम मोडला की, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याच्या पत्त्यावर थेट वाहन परवाना निलंबित करत असल्याची नोटीस पाठवली जाते. त्यानंतर चौकशीदरम्यान दोषी आढळल्यास तत्काळ त्याचा परवाना निलंबित केला जातो.
वाहनचालकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. याबाबत जागृत करणे आमचे उद्दिष्ट आहे, पण नियम मोडणाऱ्यांच्या या कृत्यांना आळा बसणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी केलेल्या चुकांची शिक्षा होणेही आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही वाहन परवाने निलंबित करण्याच्या कारवायांवर भर दिला आहे.
- रोहित काटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
वाहन चालवताना नियमांचे पालन करा. दारू पिऊन वाहन चालवणे हा केवळ नियमभंग नाही, तर एक सामाजिक गुन्हा आहे. मोबाईलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे यासारख्या चुकीच्या सवयी तुमच्या व इतरांच्या जीवावर बेतू शकतात.
- हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी
वर्ष कारवाई
२०२० -२१ : निलंबित - १०९०
२०२१ - २२ : निलंबित - १४८९
२०२२ - २३ : निलंबित - २२४४
२०२३ - २४ : निलंबित - १२९
२०२४ - २५ : निलंबित - २०५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.