सम्राट अशोक विद्यालय विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांना पाठवल्या राख्या
विद्यार्थ्यांनी पाठवल्या सीमेवरील जवानांना राख्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयात कारागृहातील कैदी बांधव, पोलिस, रिक्षावाले, दिव्यांगांना राखी बांधणे, असे दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत रक्षाबंधन कार्यक्रम राबविण्यात येतात. यंदा सीमेवरील जवानांना इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी राख्या पाठवल्या आहेत. तसेच पोस्ट कार्डच्या माध्यमातून भावनिक पत्र लिहीत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील शाळेचा विद्यार्थी सेवानिवृत्त सैनिक हवालदार सुरेश यादव यांच्या पत्नी स्मिता यादव व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील आसाम येथे कार्यरत असलेला शाळेचा माजी विद्यार्थी प्रकाश दंडवते प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. स्मिता यादव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण हे शस्त्र महत्त्वाचे आहे. शिका आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या भारतासाठी योगदान द्या. सीमेवरील जवान जसे देशाचे रक्षण करतात तसे आपले कर्तव्य आहे देश रक्षणाचे. आपण प्रत्येकाने ठरविले की पाण्याची बचत करणार, प्रदूषणावर आळा घालणार, प्लॅस्टिकचा वापर करणार नाही, एवढे जरी केले तरी आपले देशसेवेसाठी खूप मोठे योगदान ठरेल. राख्या आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्र सीमेवर कार्यरत असलेले सैनिक शाळेचे माजी विद्यार्थ्यांच्या पत्यावर स्पीड पोस्टने पाठवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक गणेश पाटील यांनी केले तर आभार सहशिक्षिका संगीता पाटील यांनी मानले.