कल्याणची कुस्तीपटू वैष्णवी पाटीलची भारतीय संघात निवड

कल्याणची कुस्तीपटू वैष्णवी पाटीलची भारतीय संघात निवड

Published on

कल्याणची कुस्तीपटू वैष्णवी पाटीलची भारतीय संघात निवड
कल्याण, ता. ४ (बातमीदार) : पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या मांगरूळ गावच्या वैष्णवी पाटीलने ६५ किलो वजनी गटातील चाचणीत यश मिळवून पहिल्यांदाच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. हरियाणाच्या मुस्कानचा ७-२ने एकतर्फी पराभव करून वैष्णवीने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. १३ ते २१ सप्टेंबरदरम्यान झाग्रेब येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्य कुस्ती स्पर्धेत ती भारताकडून खेळणार आहे.

झाग्रेब क्रोएशिया येथे होणारी ‘झाग्रेब ओपन’ ही एक प्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा असून, भारतातील आणि जगातील पुरुष व महिला कुस्तीपटूंसाठी ती महत्त्वाची मानली जाते. या स्पर्धेत वैष्णवीसह भारताचे अनेक कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. वैष्णवी ही सध्या महाराष्ट्रातील एक आघाडीची महिला कुस्तीगीर असून, ती सध्या हरियाणाच्या हिसार येथे प्रशिक्षक जसबीर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

पाटील कुटुंबातील अनेक जण कुस्ती क्षेत्रातील असल्याने तिला या खेळाचे वेड लागले. वैष्णवीने आधी मातीवर कुस्ती खेळायला सुरुवात केली होती. २०२०नंतर तिने मॅटवरची फ्रीस्टाइल कुस्तीचा सराव सुरू केला. तिच्या अथक मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे तिला राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळाले. राज्यस्तरीय व महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धांत तिने अनेक पदके जिंकली आहेत. हेलेन मारौलिस या अमेरिकन जागतिक विजेत्या कुस्तीपटूला ती आपला आदर्श मानते. भारतासाठी ऑलिंपिक पदक जिंकणे आणि जागतिक स्तरावर यश मिळवणे हे वैष्णवीचे ध्येय असून, ती तिच्या मार्गावर अग्रेसर आहे. खेळातील सातत्य, मेहनत आणि चिकाटी हीच माझ्या यशाची सूत्रे असल्याचे वैष्णवी सांगते. तिच्या पुढील प्रवासासाठी कल्याणसह संपूर्ण महाराष्ट्र व भारतातून आता तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com