शिक्षक पुरस्कार साठी उरणचे शिक्षक प्रविण पाटील यांची निवड.
शिक्षक पुरस्कारासाठी उरणचे शिक्षक प्रविण पाटील यांची निवड
उरण, ता. ४ (वार्ताहर) ः शिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दरवर्षी जाहीर केला जातो. या वर्षी रायगड जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदायलीवाडी उरण येथे उपशिक्षक प्रवीण जनार्दन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
प्रवीण पाटील हे विद्यार्थ्यांना गेले २८ वर्ष ज्ञानदानाचे काम करीत आहेत. या सेवेत त्यांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, जिल्हा शिक्षण व व्यावसायिक विकास संस्था पनवेल, रायगड येथे विषय सहाय्यक म्हणून काम केले आहे. गेली १८ वर्षे आदिवासी वाडीवर शिक्षक म्हणून कार्य केलेले आहे. महाराष्ट्र शासन आयोजित सिंगापूर या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यात प्रवीण पाटील यांनी सहभाग घेतला आहे. देश पातळीवरील गुवाहाटी, सिक्कीम या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना राज्यात व राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी समन्वयक म्हणून शिक्षक प्रवीण पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सामाजिक जीवनात अनेक आदिवासी लोकांना विविध प्रकारचे दाखले काढून देण्यास प्रवीण पाटील हे मदत करत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत अनेक सामाजिक कार्य करण्यात प्रवीण पाटील यांनी अग्रेसर भूमिका घेतली आहे. या व अशा अनेक विविध कार्य केलेले असल्याने या कार्यामुळे रायगड जिल्ह्यातून राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.