शिवमंदिरात घुमला बम, बम भोलेचा गजर
कळंबुसरे शिवमंदिरात घुमला बम बम भोलेचा गजर
उरण, ता. ४ (वार्ताहर) ः तलावाच्या काठावर वसलेले कळंबुसरे गावातील जागृत स्वयंभू शिवमंदिर हजारो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. श्रावणी सोमवारनिमित्त या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळपासून भाविक आपआपल्या कुटुंबासह महादेवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. यावेळी बम बम भोलेचा गजर मंदिरात घुमत आहे.
उरण तालुक्यातील कळंबुसरे हे निसर्गाच्या कुशीत विसावलेले गावे आहे. या गावात पुरातन जागृत शिवमंदिर हे तलावाच्या काठावर वसलेले आहे. या तलावाच्या ठिकाणाहून वनवासात पांडवांनी आई एकविरा देवीच्या आशीर्वादाने श्री महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन अज्ञातवासातील प्रवास केल्याची आख्यायिका सांगितली जाते.
या मंदिरात दर सोमवारी आणि श्रावणी सोमवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. श्रावणी सोमवारनिमित्त हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, संध्याकाळी आरती त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे.