मुंबई-पुणे प्रवास जीवघेणा

मुंबई-पुणे प्रवास जीवघेणा

Published on

मुंबई-पुणे प्रवास जीवघेणा
वर्षभरात ९७ अपघातांची नोंद, शेकडोजण जायबंदी
अनिल पाटील ः सकाळ वृत्तसेवा
खोपोली, ता. ५ ः मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सहा ठिकाणांवर सर्वात जास्त अपघातांची नोंद आहे. यात खोपोलीसाठीचा बाहेर पडण्याचा मार्ग ते आडोशी उतारापासून ढेकू अंतर जीवघेणे बनले आहे. या ठिकाणी वर्षभरात ९७ लहान-मोठे अपघात झाले असून १४ जणांचा मृत्यू तर शेकडो जण जायबंदी झाले आहेत.
मुंबई-पुणेवरील भातण बोगदा, माडप बोगदा, आडोशी उतार, अंडा पॉइंट, खोपोलीची बाह्यमार्गिका सर्वाधिक अपघाती क्षेत्र बनले आहे. अतिवेग, बेदरकारपणे धावणाऱ्या वाहनांबरोबर तीव्र उतार, वळणांमुळे ७० ते ७५ टक्के अपघात याच ठिकाणांवर झाले आहेत. आठवड्याभरापूर्वी आडोशी बोगद्यात अनियंत्रित ट्रकमुळे २५ वाहनांचे नुकसान झाले. तर दोघांचा मृत्यू झाला. २४ मे रोजी भरधाव ट्रेलर कारला धडकल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता.
----------------------------------------
अपघातांमुळे प्रशासन सतर्क
तीव्र उतार, असुरक्षित वळण रस्ता तसेच इंधन वाचवण्यासाठीची वाहन चालवण्याची पद्धतींमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तर अनेकदा वाहतूक नियमांचे उल्लंघन करून अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे सर्वाधिक अपघात झाले आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनीही दखल घेतली आहे. तसेच अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही संबंधित प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.
--------------------------------
‘या’ उपाययोजनांची गरज
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी द्रुतगती मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र उपाययोजना, दर्शक सूचना फलक लावणे, वेग मर्यादा दर्शक फलक लावणे, तुटलेल्या दुभाजकांची दुरुस्ती आदी उपाययोजना राबवताना अपघाताचे प्रमाण शून्यावर आणणे, अपघातानंतर जखमींना तत्काळ उपचार सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
------------------------------
- तीव्र वळण रस्त्यावर वेगावर नियंत्रण
- निर्बंध असलेल्या रस्त्यावरून वाहतुकीस बंदी
- अपघातप्रवण क्षेत्रात वेग मर्यादेचे सूचना फलक
- वाहनांची तांत्रिक तपासणी होण्याची गरज
- नियम मोडणाऱ्यांचा प्रशिक्षणावर भर
-------------------------------
‘मिसिंग लेन’चा प्रभावी उपाय
नोव्हेंबरमध्ये मिसिंग लेन सुरू होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान जाहीर केले आहे. या मार्गिकेमुळे खंडाळा घाटातील चारचाकी वाहनांचा प्रवास सुरक्षित होणार आहे. तसेच पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने इंधन, वेळ वाचवणार असून घाट रस्त्यावरील अपघातांवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.
--------------------------------
अपघातप्रवण क्षेत्रात वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास होणाऱ्या अपघातांच्या संख्येत तातडीने घट होण्याची खात्री आहे. यासाठी वाहनांची तांत्रिक तपासणीबरोबर चालकांची मानसिकता बदलण्याचीही गरज आहे.
- सचिन हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खोपोली
----------------------------------------
वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. वाहनचालकांत जागृतीसाठी ठोस प्रयत्नांची आवश्यकता आहे. तसेच अपघात घडल्यावर तातडीने उपचार होण्यासाठी खोपोली परिसरात सुविधांनी परिपूर्ण रुग्णालयाची नितांत गरज आहे.
- गुरुनाथ साठेलकर, समन्वयक, हेल्प फाउंडेशन व आपत्कालीन मदत सामाजिक संस्था, खोपोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com