थोडक्यात बातम्या रायगड
मोकाट गुरांचा महामार्गावर विळखा; अपघातांचा धोका वाढला
खालापूर, ता. ५ (बातमीदार) ः खालापूर तालुक्यात मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. महामार्गावर मोकाट गुरांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. वर्षभरापूर्वी पोलिस कारवाईनंतर मालकांनी गुरे गोठ्यात बांधली होती. मात्र अलीकडे कारवाई थांबल्याने पुन्हा मोकाटा गुरांची डोकेदुखील वाढली आहे.
खालापूर तालुक्यात मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे अपघात वाढले आहेत. शिवाय वाहनचालकांना वाहतुकीस अडथळा होत आहे. याशिवाय रात्री- अपरात्री गुरे चोरणाऱ्या टोळीकडून मोकाट जनावरांची शिकार करण्यात येत आहे. आठवड्यात खालापूर, खोपोली परिसरात गुरे कत्तलीच्या तीन घटना घडल्या आहेत. या प्रकारांना आळा बसावा यासाठी गेल्या वर्षी खालापूर पोलिस ठाण्यातर्फे गावोगावी जनजागृती करण्यात आली होती. वाडी वस्ती आणि गावोगावी रिक्षातून दवंडीच्या माध्यमातून गुरांच्या मालकांना जागरूक करण्यात आले होते. पोलिस कर्मचारी दवंडीच्या माध्यमातून मालकांना गुरांना गोठ्यात बांधण्याचे आवाहन करत होते. तर अपघात झाल्यास संबंधित गुरे मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दवंडीच्या माध्यमातून दिली जात होती. याप्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात तीन गुन्हेदेखील दाखल झाले होते. त्यामुळे मोकाट गुरांच्या मालकांनी भीतीपोटी काही दिवस गुरे गोठ्यात बांधली होती. दरम्यान पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता असल्याने जनावरांना पुन्हा मोकाट सोडले जात आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी प्रशासनाने पुन्हा सक्त कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
................
सिद्धेश्वर परिसरात डॉक्टरांची औषधी वनस्पती अभ्यास सहल
कर्जत (बातमीदार) ः रायगड मेडिकल असोसिएशन आणि आयुर्वेद व्यासपीठ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने पालीजवळील सिद्धेश्वर परिसरात औषधी वनस्पती अभ्यास सहल व पावसाळी सहलीचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर, विद्यार्थी व आयुर्वेद अभ्यासकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. डॉ. अशुतोष कुळकर्णी, डॉ. मृदुला जोशी, डॉ. अदिती भिडे आदींच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन झाले. सहलीत सहभागी डॉक्टर व विद्यार्थ्यांना परिसरातील दुर्मिळ औषधी वनस्पती ओळखण्याची संधी मिळाली. डॉ. अदिती भिडे यांच्या संकल्पनेतील नैसर्गिक जेवण, औषधी वनस्पतींचे प्रात्यक्षिक व सखोल मार्गदर्शन यामुळे उपक्रम अधिक संस्मरणीय ठरला.
.......................
संध्या दिवकर यांची कोमसाप रोहा अध्यक्षपदी फेरनिवड
रोहा (बातमीदार) ः कवयित्री संध्या दिवकर यांची कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा शाखेच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड झाली आहे. २०२२–२३ या कालावधीत त्यांच्या नेतृत्वात शाखेने उल्लेखनीय साहित्यिक कार्य केले. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष आरती धारप, सचिव विजय दिवकर, खजिनदार अजित पाशिलकर, तसेच सल्लागार म्हणून मकरंद बारटक्के यांची नियुक्ती झाली. संध्या दिवकर यांनी आपल्या कार्यकाळात नवोदित साहित्यिकांना संधी दिली असून विविध साहित्यिक उपक्रमांद्वारे रोहा शाखेला नवे आयाम दिले. साहित्यसेवेबरोबरच महिलांचा सहभाग, युवाशक्तीचे नेतृत्व आणि साहित्यसंस्कृतीच्या वृद्धीसाठी दिवकर यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या फेरनिवडीमुळे साहित्यिक वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे.
...................
थोर समाजसुधारक शंकरशेठ यांची पुण्यतिथी मुरूडमध्ये साजरी
मुरुड (बातमीदार) ः थोर समाजसुधारक जगन्नाथ शंकरशेठ यांची १६० वी पुण्यतिथी मुरूड येथे सोनार समाजगृहात साजरी करण्यात आली. समाज अध्यक्ष प्रकाश राजपुरकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पत्रकार गणेश चोडणेकर यांचा जिल्हा पत्रकारिता पुरस्कारासाठी, तर ऋषी पोतदार यांचा आदिवासी मुलीचा जीव वाचवल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षणप्रेम वाढविण्याच्या उद्देशाने इयत्ता १ ली ते पदवीपर्यंतच्या यशस्वी विद्यार्थ्यांना वह्या, पेन व रोख स्वरूपात गौरवण्यात आले. समाज अध्यक्षांनी नाना शंकरशेठ यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. महिला अध्यक्ष वासंती उमरोटकर यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी केली.
.............
खालापूरात ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत दाखले वाटप
खालापूर (बातमीदार) ः महसूल सप्ताह २०२५ अंतर्गत खालापूर महसूल मंडळात ''छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान'' अंतर्गत विविध दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर सरनोबत नेताजी पालकर सभागृहात पार पडले. तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी संदेश पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आधार कार्ड, उत्पन्न, जात, अधिवास व आयुष्यमान भारत कार्ड इत्यादी दाखले नागरिकांना प्रदान करण्यात आले. या उपक्रमातून नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक सेवा मिळाल्याने समाधान व्यक्त झाले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडले. महसूल विभागाच्या लोकाभिमुख कारभाराचा अनुभव नागरिकांना मिळाला असून, महसूल सेवक व अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे हे शिबिर यशस्वी ठरले.
............
डॉ. देविदास बामणे यांना ‘समाज भूषण’ पुरस्काराने गौरव
पेण (वार्ताहर) ः भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. देविदास बामणे यांना ‘छत्रपती राजश्री शाहू महाराज समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नंदूरबार येथे २७ जुलै रोजी पार पडलेल्या सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष गोरखा देवरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान झाला. डॉ. बामणे यांचे शिक्षणक्षेत्रात योगदान असून ते सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या डॉ. बामणे यांना या पुरस्कारामुळे समाजसेवेतील त्यांच्या कार्याची पावती मिळाली आहे. पुरस्काराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हा सन्मान अधिक जबाबदारी वाढवणारा आहे. शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे समन्वयाने केलेले योगदान यामुळेच हा गौरव प्राप्त झाला, असे ते म्हणाले.
.....................
चौकीचापाडा शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
पोयनाड (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील चौकीचापाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन पाटील यांच्या हस्ते पार पडला. शाळेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने ग्रामस्थांनी वेळोवेळी शासनाकडे दाद मागितली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून, शासनाने नवीन इमारतीसाठी मंजुरी दिली आहे. उपसरपंच भूपेंद्र पाटील यांच्या माध्यमातून काम सुरू होणार आहे. वास्तुविशारद रुचीर पाटील यांनी इमारतीचा आराखडा तयार केला आहे. कार्यक्रमात अनेक ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील यांनी आभार मानले, तर जगदीश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
............
आकार प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनी समूह गीत स्पर्धेचे आयोजन
पोलादपूर (बातमीदार) ः सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आकार प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त २० ऑगस्ट रोजी पोलादपूर तालुकास्तरीय समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साने गुरुजी विद्यालय, लोहारे येथे होणाऱ्या या स्पर्धेत प्राथमिक आणि माध्यमिक गटातील शाळांना सहभागी होण्याची संधी आहे. याशिवाय ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभही होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पीएचडी पदवीधारक डॉ. निलेश कुंभार व डॉ. अक्षय माळवदे उपस्थित राहणार आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सलागरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तालुक्यातील सर्व शाळांना याची नियमावली लवकरच कळवण्यात येणार आहे.