गुटख्याच्या छुप्याविक्रीचा भांडाफोड
गुटख्याच्या छुप्या विक्रीचा भांडाफोड
श्रीवर्धनमधून ९१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
श्रीवर्धन, ता. ५ (वार्ताहर)ः श्रीवर्धन तालुक्यात सर्रास गुटखाविक्री होत आहे. अशाच प्रकारे छुप्या मार्गाने गुटखाविक्रीचा प्रकार श्रीवर्धन पोलिसांनी उघडकीस आणला असून तब्बल ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
श्रीवर्धन येथील बुढण पाखाडीत प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आला असल्याची माहिती श्रीवर्धन पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन लकडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलिस हवालदार प्रशांत देशमुख, पोलिस शिपाई कृष्णा कदम यांनी सापळा रचत सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका घराच्या आवारातील उभ्या असलेल्या चारचाकीची तपासणी केली. या वेळी गाडीमध्ये प्रतिबंधित गुटख्याच्या सहा पिशव्या आढळून आल्या. त्याची अंदाजे किंमत ९१,५२० इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारचाकीसह एकूण २,४१,५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच बुढण पाखाडीत राहणारा शोएब पटेलला (वय २७) अटक केली आहे.