नवजात बाळासाठी अमूल्य दुग्धदान
नवजात बाळासाठी अमूल्य दुग्धदान
५१ हजारांहून मातांचे योगदान; सायन रुग्णालयाच्या मातृदुग्ध बँकेची कामगिरी
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : वजनाने कमी आणि जन्मत: जीवाला धोका असणाऱ्या नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आईचे दूध ही महत्त्वाची भूमिका बजावते. आईचे दूध हे जीवामृत असते, असे कितीही म्हटले तरी प्रत्येक नवजात बाळ किंवा मातेला ही नैसर्गिक देणगी मिळतेच असे नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे नवजात शिशू काचेच्या पेटीत असताना या बालकांसाठी मातेचे दूध हे वरदान ठरते.
१ ते ७ ऑगस्टदरम्यान सध्या सुरू असलेल्या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त मुंबई महापालिकेअंतर्गत असलेल्या सायन रुग्णालयातील मातृदुग्ध बँकेच्या कामगिरीचा उल्लेख करावा लागेल. आतापर्यंत ५१ हजारांहून अधिक मातांनी दुग्धदानाचे अमूल्य योगदान दिले आहे. यापैकी काही मातांनी स्वेच्छेने दुग्धदानाचेही कर्तव्य बजावले आहे. यामुळे ११ हजार नवजात बालकांना जीवनरक्षक दूध मिळाले.
आशा सेविकांना प्रशिक्षण
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मातांना आधार देण्यासाठी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. स्तनपानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यावर्षी आशा सेविकांनाही प्रशिक्षण दिले जाईल. एकूण ६० आशा सेविकांना सायन रुग्णालयाच्या नवजात बालक विभागाकडून प्रशिक्षण दिले जाईल. यासह विद्यार्थी परिचारिका, कार्यरत परिचारिका, निवासी डॉक्टर्स यांनाही प्रशिक्षण दिले जाईल.
प्रसूती झालेल्या आणि प्रसूती होण्यापूर्वी मातेचे योग्य पद्धतीने समुपदेशन होणे फार गरजेचे आहे. त्यासाठी एक समर्पित टीम असायला हवी. एका सर्व्हेनुसार फक्त ४१ टक्के स्तनपान होण्याचे प्रमाण आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यापासून ते बाळ जन्माला आल्यानंतरही माता आणि बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. आम्ही मातेने जास्तीत जास्त स्तनपान करावे, जेणेकरून ती स्वत:च्या बाळाला आणि गरजेनुसार दुसऱ्या बाळांनाही दूधदान करू शकेल एवढे सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. या सर्व प्रक्रियेत मातेला सकारात्मक ऊर्जा मिळणे फार आवश्यक असते.
- डॉ. स्वाती मणेरकर,
विभागप्रमुख व प्राध्यापक, नवजात बालक विभाग, सायन रुग्णालय
११ हजार नवजात बालकांना नवसंजीवनी
या दानामुळे कमी वजनाच्या, अपुरी वाढ असलेल्या बालकांना मदत झाली आहे. ज्या माता प्रसूतीनंतरच्या गुंतागुंतीमुळे स्तनपान करू शकत नाहीत, त्यांच्या बालकांना या मातृदुग्ध पेढीतून मदत होते. आतापर्यंत ज्यांचे वजन दीड किलोपेक्षा कमी असते आणि ज्यांना एनआयसीयूची गरज पडते अशा ११ हजार बालकांना दान केलेले दूध देण्यात आले आहे.
अमृतरूपी दूध दान करण्याकडे कल
२०२० - ७,६८९ मातांनी दूध दान केले
२०२१ - ६,४०० मातांनी दूध दान केले
२०२२ - १०,६६९ मातांनी दूध दान केले
२०२३ - ११,४३१ मातांनी दूध दान केले
२०२४ - १०,५८४ मातांनी दूध दान केले
२०२५ जूनपर्यंत - ४,६५८ मातांनी दूध दान केले
सायन रुग्णालयात दरवर्षी १२,००० नवजात बालकांचा जन्म
दरवर्षी १,५०० ते २,००० बाळांना पुरवठा
५१ हजार ४३१ मातांनी केले दूध दान
दरवर्षी सरासरी १०,००० मातांचे समुपदेशन आणि व्यावहारिक मदत
मातेच्या दुधाचे महत्त्व
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि नवजात शिशूंचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी, विशेषतः वैद्यकीय आव्हानांना तोंड देणाऱ्या बालकांसाठी आईचे दूध आवश्यक आहे. जेव्हा बाळाला संसर्गाचा धोका असतो किंवा जेव्हा नैसर्गिक पद्धतीने आई स्तनपान करू शकत नाही, तेव्हा मिल्क बँकेतील दूध एक महत्त्वाचा पर्याय असतो.
दूधदानाची प्रक्रिया
- एचआयव्ही, हिपॅटायटिस आणि इतर आजार नसतील अशी कोणतीही स्तनपान करणारी माता दूधदान करू शकते.
- रुग्णालयाचा हेल्पलाईन क्रमांक सोबत असावा
- मातेला सर्व आरोग्य अहवाल रुग्णालयात सबमिट करावे लागतात किंवा माता स्वत: रुग्णालयात जाऊन सर्व चाचण्या करून घेऊ शकते.
- गरज असल्यास दूधदान करणाऱ्या महिलेला फिटनेस प्रमाणपत्रदेखील लागते.
अशी होते दूध शुद्ध करण्याची प्रक्रिया
मातेने दान केलेल्या दुधाची चाचणी केली जाते. सोबतच दात्याचीही तपासणी केली जाते. दान केलेले दूध रासायनिक प्रक्रियेद्वारे शुद्ध केले जाते, जेणेकरून बॅक्टेरिया मागे राहणार नाहीत. यानंतर ते रुग्णालयात साठवले जाते आणि गरजू बाळांना दिले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.