खाडीची मासेमारी बंद झाल्याने कोळी बांधवांवर बेकारीचे संकट

खाडीची मासेमारी बंद झाल्याने कोळी बांधवांवर बेकारीचे संकट

Published on

कोळी बांधवांवर बेकारीचे संकट
खाडीची मासेमारी बंद झाल्याने हाल
ठाणे शहर, ता. ५ (बातमीदार) ः ठाण्यातील खाडी किनाऱ्यांवर अवलंबून असलेल्या कोळी समाजावर बेकारीचे मोठे संकट कोसळले आहे. विकासाच्या नावाने खाडी किनाऱ्यावर राडारोड्याचा भराव, विविध प्रकल्प, अनधिकृत बांधकामे, झोपडपट्ट्यांमुळे खाडी पात्र अरुंद होत असून मासेमारीचा व्यवसाय बंद पडला आहे. ठाण्यातील खाडीचा एकही भाग मासेमारी करिता शिल्लक राहिला नसल्याने मोठे संकट कोसळले आहे. यासंबंधी ठाण्यातील कोळी बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत राष्ट्रीय मत्स्यपालन धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
ठाणे जिल्ह्यात खाडी किनारी वसलेला कोळी समाज पूर्वापारपासून मासेमारी करून आपली उपजीविका करीत आहे. मात्र, ठाण्यातील खाडी किनाऱ्यांवर होत असलेली विकास कामे, अनधिकृतपणे होत असलेल्या भरावाने मासेमारीवर संकट आले आहे. खाडी व खाजण क्षेत्रांमध्ये झपाट्याने होत चाललेली शहरविकास, बंदर प्रकल्प, खाडी भराव आणि औद्योगिक अतिक्रमणामुळे मासेमारीसाठी आवश्यक असलेले नैसर्गिक ठिकाणांवर गदा येवू लागले आहे. मासेमारीसाठी जाळी टाकण्याच्या जागा, मासे प्रजनन क्षेत्रे आणि विक्रीसाठी लागणाऱ्या सुविधा या सगळ्याच गोष्टी बुडीत होत चालल्या आहेत. परिणामी शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, मासेमारी समाजात अदृश्य बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे अखिल भारतीय कोळी समाजाचे म्हणणे आहे. कोळी समाजावरील बेरोजगारी दूर करण्यासाठी अखिल भारतीय कोळी समाज संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून राष्ट्रीय मत्स्यपालन धोरण २०२० नुसार पारंपरिक मासेमारीस पूरक वातावरण निर्माण करून द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

मागण्या :
गाव, उपगाव, खाडी घोषित करून मासेमारीसाठी अधिकृत परवाने द्यावेत, मासेमारीसाठी लागणारी परंपरागत साधने (होडी, खवला, जाळी) यांना कायदेशीर मान्यता द्यावी, नैसर्गिक जलाशयांमध्ये मत्स्यपालनाच्या योजना लागू कराव्यात, मासे विक्रीसाठी कायमस्वरूपी मच्छी बाजारांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, मासेमारी करणाऱ्या समाजासाठी विशेष निधी व विकास योजना कार्यान्वित कराव्यात.

विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखत मासेमारी व्यवसायाचे जतन करणे हे प्रशासनाचे नैतिक कर्तव्य आहे. बेलापूर एमआयडीसी पट्ट्यामुळे समाजातील सुमारे चार लाख लोक बाधित झाले आहेत. निसर्ग, खाडीचा समतोल राखायचा असेल तर मासेमारीच्या ठिकाणांचे जतन झालेच पाहिजे. ही जबाबदारी शासन, प्रशासनाची आहे.
- आनंद कोळी, अखिल भारतीय कोळी समाज नवीदिल्ली, ठाणे जिल्हाध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com