कामा रुग्णालयात युरो गायनॅकोलॉजी विशेष ओपीडी पूर्ण सक्षमेने सुरू

कामा रुग्णालयात युरो गायनॅकोलॉजी विशेष ओपीडी पूर्ण सक्षमेने सुरू

Published on

कामा रुग्णालयात युरो गायनॅकोलॉजी विशेष ओपीडी पूर्ण सक्षमेने सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५: कामा रुग्णालयात प्राथमिक टप्प्यात सुरू केलेली युरो गायनॅकोलॉजी विशेष ओपीडी आता पूर्ण सक्षमतेने सुरू आहे. एवढेच नव्हे तर या युरोगायनॅकोलॉजी विभागात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मान्यतेने विद्यापीठसंलग्न फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
भारतातील एकतृतीयांश महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी युरोगायनॅकोलॉजीसंबंधी समस्या येतात. या समस्या अनेकदा निदर्शनासही येत नाहीत. त्यामुळे ही आरोग्यसेवा सर्व स्तरांतील महिलांना उच्च दर्जाची आणि समतोल उपचार सेवा देत असल्याचे मत तज्ज्ञ मांडतात. ही दोनमजली केंद्र भारतातील सर्वात प्रगत युरोगायनॅकोलॉजी केंद्रांपैकी एक आहे.
तळमजल्यावर सहा क्लिनिक खोल्यांसह बाह्यरुग्ण विभाग आहे, तर पहिल्या मजल्यावर अत्याधुनिक निदान केंद्र आहे. या विभागाच्या प्रमुख डॉ. अपर्णा हेगडे यांनी सांगितले, की हे एक उत्कृष्ट उपचारांसाठीच नाही, तर अत्याधुनिक संशोधन व प्रगत प्रशिक्षणासाठीचे एक केंद्रबिंदू आहे. आतापर्यंत अनेक महिलांना या विभागामुळे दिलासा मिळाला आहे.
कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले, की २०२४मध्ये रुग्ण तपासणीला सुरुवात झाली. त्यानुसार ५७२ रुग्ण तपासण्यात आले. तसेच १३७ रुग्णांवर मूत्राशय इन्स्टिलेशन ही प्रक्रिया करण्यात आली. आता ही स्पेशल ओपीडी पूर्ण सक्षमेने सुरू करण्यात आली आहे.
यासाठी सायटस कंपनीने करारातून दीड कोटी आणि टाटा ट्रस्टकडून अडीच कोटी अशा प्रकारचा खर्च करण्यात आला आहे. या ठिकाणी एक्स-रे मशीन, यूएसजी मशीन, युरो-डायनॅमिक्स, लेझर सर्जरी मशीन, फिजीओथेरपी मशीनदेखील येथे उपलब्ध आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com