स्वयंपुनर्विकास शिबिराला जुईनगरमध्ये प्रतिसाद
स्वयंपुनर्विकास शिबिराला जुईनगरमध्ये प्रतिसाद
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने सोसायट्यांना दिलासा
जुईनगर, ता. ५ (बातमीदार) ः नवी मुंबईच्या जुईनगर परिसरात नुकत्याच पार पडलेल्या स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपचे सामाजिक कार्यकर्ते विजय साळे यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबईतील अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिबिरात स्वयंपुनर्विकास प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू, निवृत्त न्यायाधीश सुबोध सोनोने, महाराष्ट्र राज्य को-ऑप. हाउसिंग फेडरेशनचे संचालक ॲड. प्रसाद परब, आर्किटेक्ट सोपान प्रभू, नवी मुंबई को-ऑप. हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुनील चौधरी, सचिव भास्कर म्हात्रे व संचालिका छाया म्हात्रे यांच्यासह इतर तज्ज्ञ उपस्थित होते. जुईनगर, सानपाडा, वाशी, नेरूळसारख्या भागांमध्ये सिडकोने उभारलेल्या जुन्या इमारतींची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. अनेक इमारतींना धोका असल्याने त्यांच्या पुनर्विकासाची गरज भासू लागली आहे. मात्र नागरिकांमध्ये विकसकांद्वारे पुनर्विकास करावा की सोसायटीने स्वतः पुढाकार घ्यावा, याबाबत संभ्रम आहे.
....................
रहिवाशांच्या शंका दूर
या शिबिरात एफएसआय वाढ, शासनाच्या जीआरसंदर्भातील माहिती, रखडलेल्या परवानग्यांवर पालिका पातळीवर होणारी कारवाई आणि त्याचा लाभ सोसायट्यांना कसा होऊ शकतो, यावर चर्चा झाली. विशेषतः शासनाकडून मिळणाऱ्या चार एफएसआयबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. या शिबिरातून नागरिकांच्या अनेक शंका दूर झाल्या असून, स्वयंपुनर्विकासाबाबत सकारात्मक दृष्टिकोन तयार झाल्याचे स्पष्ट झाले. जुईनगर परिसरातील नागरिकांनी अशा मार्गदर्शन शिबिरांची पुनरावृत्ती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.