सिडको एम्लॉईज युनियन बरखास्त करा

सिडको एम्लॉईज युनियन बरखास्त करा

Published on

सिडको एम्प्लॉईज युनियन बरखास्त करा
समता पॅनेलची कामगार आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ ः सिडकोच्या एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने लाच घेताना अटक केल्यानंतर सिडको प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणामुळे एम्प्लॉईज युनियनची कार्यकारिणी बरखास्त करा, अशी मागणी समता पॅनेलने केली आहे. समता पॅनेलचे प्रमुख रमेश मोकल यांनी कामगार आयुक्तांकडे कार्यकारिणी बरखास्त करावी, अथवा सिडको अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत मागणी केली आहे. तसेच याबाबत ते न्यायालयाचेही दरवाजे ठोठावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या सर्व महामंडळांपैकी सिडकोची एम्प्लॉईज युनियन नावाजलेली आहे. २७ फेब्रुवारीला युनियनची निवडणूक झाली. या निवडणुकीत प्रगती पॅनेलविरोधात समता पॅनेलने उमेदवार दिले होते. अध्यक्ष पदाच्या निडणुकीत नरेंद्र हिरे यांनी समता पॅनेलचे रमेश मोकल यांचा पराभव केला. हिरेंची अध्यक्ष म्हणून वर्णी लागली. काही दिवसांपूर्वी नरेंद्र हिरे हे लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने लावलेल्या सापळ्यात पकडले गेले. याप्रकरणी हिरे यांना सिडको प्रशासनाने निलंबीत केले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाचा कारभार ठप्प झाला आहे. सिडकोअंतर्गत कामगारांचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत. वेतन आयोगापासून कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्वांवर बोलण्यासाठी तसेच वाचा फोडण्यासाठी बैठकीचे आयोजन होत नाही. अशा परिस्थितीत नवीन अध्यक्ष नियुक्त करावे, अन्यथा जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीनची निवड करावी, अथवा प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून पराभूत झालेल्या उमेदवाराची निवड करावी, अशी मागणी रमेश मोकल यांनी कामगार आयुक्तांकडे केली आहे.
---------------------------------------
चौकट
सिडको एम्प्लॉईज युनियनच्या मंजूर झालेल्या घटनेनुसार अध्यक्षपदावरील अधिकारी निलंबित अथवा निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागेवर अंतर्गत पदाधिकाऱ्यांमधून अध्यक्ष निवड करता येते. त्यानुसार माझी अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. तसेच निवडणूक झाल्यानंतर पॅनेल अस्तित्वात राहत नाहीत, असे सिडको एम्‍प्‍लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com