टपाल विभागाचे सर्व्हर डाउन

टपाल विभागाचे सर्व्हर डाउन

Published on

खारघर, ता. ५ (बातमीदार) : कार्यालयीन कामकाज वेगवान होण्यासाठी टपाल खात्याकडून डिजिटल प्रणालीचा वापर सुरू आहे; मात्र उत्सव काळातच सर्व्हर डाऊन झाल्यामुळे टपाल कार्यालयांसमोर राख्या पाठवण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहे.
बहीण-भावाच्या अतूट नात्याचा रक्षाबंधन सण तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. भावाला राखी पोहोचणे आवश्यक असल्यामुळे नवी मुंबई, पनवेल परिसरातील टपाल कार्यालयासमोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत; मात्र चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे राख्या पाठवणाऱ्या महिलांना टपाल कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. मंगळवारपासून प्रणाली सुरू झाली आहे; मात्र सर्व्हरमध्ये अडचण निर्माण होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, राज्यात सर्व विभागात सर्व्हरमुळे ही अडचण निर्माण झाली आहे. आजपासून प्रणाली सुरू आहे. राखी वेळेत मिळावी, यासाठी चोवीस तास काउंटर सुरू ठेवल्याची माहिती नवी मुंबई टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक बी.व्ही.एन. सुरेश यांनी दिली आहे.
-----------------------------------
खासगी कुरियरला पसंती
वाशी येथील टपाल कार्यालयात दरवर्षी रक्षाबंधन बंधनासाठी डिजिटल प्रणालीचे कामकाज एका एजन्सीच्या माध्यमातून केला जात होते. या एजन्सीचा ठेका समाप्त झाला असून आता विभागाकडून नवीन डिजिटल प्रणाली लागू करण्यात आली आहे; पण नवीन प्रणालीमुळे कामकाजात अडथळा येत असल्याने नागरिक खासगी कुरियर कार्यालयात धाव घेत आहेत.
-------------------------------
एक तासापासून रांगेत उभा आहे. सर्व्हर सुरळीत चालू राहिल्यास राख्या जातील, नाहीतर पुन्हा उद्या यावे लागेल.
- अमोल गायकवाड, वाशी

Marathi News Esakal
www.esakal.com