सांबरकुंड धरण वादाच्या भोवऱ्यात
सायली रावले : सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ५ : अलिबाग तालुक्यातील महान येथे मध्यम धरण प्रकल्प सांबरकुंड प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबदला मान्य नसल्याने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड धरण हा एक मध्यम सिंचन प्रकल्प आहे. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला असून, गेल्या चार दशकांपासून चर्चेत आहे. हा प्रकल्प अलिबाग तालुक्यातील रामराज आणि महान परिसरात प्रस्तावित आहे. या धरणाचा मुख्य उद्देश अलिबाग तालुक्यातील शेतीसाठीच्या सिंचनाची तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणे हा आहे. या प्रकल्पामुळे २,५०० हेक्टरहून अधिक शेती सिंचनाखाली येणार आहे. मात्र भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि राजकीय अनास्थेमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. निवडणुकीदरम्यान धरणाचे काम मार्गी लावणार, असे आश्वासन मतदारांना दिले जाते. परंतु कामाच्या प्रगतीबाबत ४० वर्षांपूर्वीची परिस्थिती आजही तशीच आहे. अशातच आता वाढीव मोबदल्यासाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. याच अनुषंगाने सोमवारी (ता. ४) जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले आहे. त्यात सुधारित जमीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे.
-------------------------------
विरोधाचे कारण
या धरणाला १९८२मध्ये पहिल्यांदा प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी त्याचा अंदाजित खर्च सुमारे ११ कोटी रुपये होता. तसेच भूसंपादन कायदा २०१३ नुसार प्रति हेक्टरी ८२ लाख २८ हजार २४० रुपये दर देण्यात आला होता. पण हा दर मान्य नसल्याचे कारण देत पुनर्वसनासंदर्भात शेतकऱ्यांना हमी हवी आहे.
----
सांबरकुंड धरण प्रकल्पावरील दृष्टिक्षेप
स्थान : अलिबाग तालुक्यातील महाण गावाजवळ
उद्देश : सिंचन प्रकल्प, २,५२८ हेक्टर शेतीसाठी
भूसंपादन गरज : २६३.५ हेक्टर जंगल व जमीन (२३८ हेक्टर बुडित क्षेत्र)
कालव्यासाठी जमीन :४६.६० हेक्टर
मोबदला वाटप : ३३ कोटी रुपये
---
सुधारणा झालेल्या प्रशासकीय मान्यता
मूळ मान्यता - ११.७१ कोटी (ता. २८ जुलै १९८२)
दुसरी सुधारित मान्यता - २९.७१ कोटी (ता. १६ मार्च १९९५)
तिसऱ्या दरपत्रकाला मिळालेली मान्यता - ५०.४० कोटी (ता. ६ ऑक्टो. २००१)
चौथे अद्ययावत दरपत्रक - ३३५.९२ कोटी (२०१२-१३)
पाचवे अंदाजपत्रक - ७४२ कोटी (२०१९-२०)
अद्ययावत अंदाजपत्रक - १,२०० कोटी रुपये (अंदाजित)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.