गणपत गायकवाड तरुगांतच
गणपत गायकवाड तरुंगातच
पोलिस ठाण्यातील गोळीबारप्रकरणी जामीन फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे माजी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना जामीन देण्यास मंगळवारी (ता. ५) उच्च न्यायालयाने नकार दिला. गायकवाड यांच्यासह त्यांच्या तीन साथीदारांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या पोलिस ठाण्यात जाणूनबुजून हा हल्ला (गोळीबार) करण्यात आला. या कृत्याकडे दुर्लक्ष करून किंवा सौम्यतेने पाहून अशा व्यक्तींना जामीन दिल्यास तो कायद्यापेक्षा वरचढ किंवा सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध होईल तसेच त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि न्यायालयांचे अधिकार कमकुवत होतील, असे निरीक्षण न्या. अमित बोरकर यांच्या एकलपीठाने गायकवाड यांची जामिनासाठीची याचिका फेटाळताना नमूद केले. अर्जदाराने पोलिस ठाण्यात केलेले कृत्य धक्कादायक असून हे कायद्याच्या राज्यावर घाला घालण्यासारखे असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
पोलिस ठाणे युद्धभूमी नाही. सामान्य नागरिकांनी, विशेषतः माजी आमदाराने, लोकप्रतिनिधींनी शस्त्र घेऊन पोलिस ठाण्यात जाणे अपेक्षित नाही. त्यांच्या अशा वर्तनामुळे लोकप्रतिनिधींबद्दल समाजाला भीती आणि दहशतीचा संदेश जातो. अर्जदार गणपत गायकवाड यांना हल्ला करण्यास मदत केल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने अंगरक्षक हर्षल केणे आणि दोन सहकारी कुणाल दिलीप पाटील आणि नागेश दीपक बडेराव यांनाही जामीन नाकारला. या चौघांवरही खून करण्याचा प्रयत्न, पोलिस ठाण्यात दहशत निर्माण करणे या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाचे निरीक्षण
पोलिस ठाण्यातील अशा प्रकारचा हिंसाचार हलक्यात घेता येणार नाही. कारण अशी कृती भीती आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करते. अशा प्रकारांनी राजकीय शक्ती किंवा दोन गटांच्या हिंसाचारासमोर पोलिस यंत्रणादेखील असहाय्य होऊ शकते, असा चुकीचा संदेशही जाऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. अशा कृती करणाऱ्यांवर वेळीच चाप लावला नाही किंवा अशा प्रकरणाकडे सौम्यतेने पाहिल्यास कायदा अंमलबजावणी संस्था आणि न्याय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
काय प्रकरण?
शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड आणि भाजपचे आमदार गणपत गायकवाड दोघेही जमिनीच्या वादाप्रकरणी एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी २ फेब्रुवारी २०२४ रोजी उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यात पोहोचले. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनातच गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी गणपत गायकवाड आणि हर्षल केणे यांनी आपल्या बंदुकीतून महेश आणि राहुल गायकवाड यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.