मराठी रंगभूमी संपूर्ण भारतात सर्वोच्च
मराठी रंगभूमी भारतात सर्वोच्च!
चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे उद्गार
मुंबई, ता. ५ : ‘‘मराठी चित्रपटसृष्टी हे आपल्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. भारतात चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके या मराठी माणसाने रोवला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मराठी माणसाचे योगदान केवळ चित्रपटापुरते मर्यादित नाही. आजही संपूर्ण देशभरात सर्वोत्कृष्ट रंगभूमी म्हणून मराठी रंगभूमीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारतात मराठी रंगभूमी सर्वोच्च आहे,’’ असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
६०वा आणि ६१वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा वरळी, डोम येथे भव्य स्वरूपात पार पडला. तेव्हा ते बोलत होते.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार, महसूल व वने अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘अभिजात दर्जा, सखोल आशय आणि ताकदीचे सादरीकरण यामुळे मराठी चित्रपटसृष्टी अजोड ठरते. छोटा पडदा, मोठा पडदा आणि ओटीटी अशा विविध माध्यमांतून मराठी कंटेंटचा विस्तार होत आहे आणि हे निश्चितच अभिमानास्पद आहे. सरकार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही जसे तुमच्या सर्जनातून आमचे जीवन समृद्ध करीत आहात, तसेच आम्हीही तुम्हाला पाठबळ देत राहू.’’
राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले. २०२४चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर २०२४च्या स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री काजोल यांना सन्मानित करण्यात आले. या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ या पुरस्काराने राजदूत, युनोस्कोतील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी विशाल शर्मा यांना सन्मानित करण्यात आले.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार म्हणाले, ‘‘नुकताच मी अमेरिकेत सॅन्स फ्रान्सिस्को येथे गेलो होतो. तेथील मराठी चित्रपटासाठी रेड कार्पेटचे भव्य आयोजन केले होते. अलीकडेच अमेरिकेतील नेटफ्लिक्सच्या कार्यालयाला भेट दिली. तिथे मराठी चित्रपट योग्य दरात विकत घेतलेच पाहिजेत, अशी ठाम भूमिका मांडली. मराठी चित्रपटांचे शूटिंगदेखील पूर्णतः निःशुल्क करण्यात आले. मराठी चित्रपटांना जगाच्या सृजनशीलतेवर आणि सांस्कृतिकतेवर मोहिनी घालण्याची ताकद आहे. आम्ही सरकार म्हणून या चित्रपटसृष्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मराठी चित्रपटसृष्टीला कोणताही धोका पोहोचू देणार नाही, याबाबत सरकार कटिबद्ध आहे.’’
...
‘खालिद का शिवाजी’ बंद करा!
‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट ८ ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळाले. जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःचे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे राहिले, तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या काही अज्ञात व्यक्तींकडून इतिहासाचे विकृतीकरण करणारा चित्रपट ‘बंद करा बंद करा, ‘खालिद का शिवाजी'' बंद करा’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तेव्हा ‘‘तुम्ही तुमचे म्हणणे मांडले आहे, आता कार्यक्रम खराब करू नका,’’ असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत मनोगत व्यक्त करण्यास सुरुवात केली. या प्रकरणानंतर संबंधित व्यक्तींना सुरक्षा रक्षक घेऊन गेले.
...
आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण केले!
पुरस्कार विजेती अभिनेत्री काजोल म्हणाली, ‘‘आज माझा वाढदिवस आहे आणि इतक्या आदरणीय व्यक्तींसमोर या मंचावर उभे राहणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचे आहे. हा भावनिक क्षण आहे. हा दिवस माझ्यासाठी खास आहे. कारण माझी आई आज समोर बसली आहे. तिच्या साडीत मी आज सजले आहे. विशेष म्हणजे आज ज्या सन्मानासाठी मला गौरवण्यात आले आहे, तोच पुरस्कार कधीकाळी माझ्या आईनेही मिळवलेला आहे. वाढदिवसाच्या दिवशी याहून मोठी भेट काही असूच शकत नाही. आज मी स्वतःला सांगू शकते, मी आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण केले आहे.’’
...
मी पुन्हा येईन!
अनुपम खेर यांना स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘मी आता ७० वर्षांचा आहे; पण ३० वर्षांनी हा पुरस्कार स्वीकारायला मी पुन्हा येईन.’’ त्यांच्या संवादाचा धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मी पुन्हा येईन या संवादाचा कॉपीराइट माझ्याकडे आहे; पण काही हरकत नाही. आज मी त्या डायलॉगचे कॉपीराइट अनुपम खेर यांना देतो.’’
...
माझे या शहरावरचे प्रेम!
अनुपम खेर यांना स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यानंतर ते आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, ‘‘या शहरात येऊन बघता बघता मला ४० वर्षं उलटून गेली; पण माझे या शहरावरचे प्रेम आणि आदर आजही तसेच टिकून आहे. मुंबई हे मोठ्या मनाचे शहर आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला एक तरी संधी हमखास मिळते. आज मी ७० वर्षांचा आहे; पण स्वतःला अजून म्हातारा वाटत नाही. खरेतर माझ्या प्रवासाचे मध्यंतरही अजून आलेले नाही आणि खात्री आहे पुढची ३० वर्षं मी याच उत्साहाने चालत राहीन.’’
...
अमरावतीची दोन रत्ने!
गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, की अमरावती जिल्ह्याने सुरेश भट्ट आणि भीमराव ही दोन रत्ने दिली आहेत. या दोघांची जोडी बेमिसाल आहे. त्यांना तोड नाही. पांचाळे यांनी मराठी गझलांना दिलेली उंची अवर्णनीय असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी पांचाळे यांची ‘कळीचे फुल झालो मी, फुलांचे हार झालो मी, जराशा अत्तरासाठी कितीदा ठार झालो मी’ ही गझल म्हणून दाखवली. या वेळी टाळ्यांचा कडकडाट झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.