थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

जय भवानी सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सभा उत्साहात
रोहा (बातमीदार)ः जय भवानी सहकारी पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थाध्यक्ष पी. बी. सरफळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी उपाध्यक्ष शंकरराव भगत, सचिव सुहास खरिवले व संचालक उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी महेश बामगुडे यांनी प्रास्ताविक केले. मागील इतिवृत्त, अहवाल व ऑडिट रिपोर्ट सादर करण्यात आले. सभासदांनी अहवालावर विचारलेल्या प्रश्नांची अध्यक्ष सरफळे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. नफ्यात झालेल्या वाढीमुळे संचालक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. ८ टक्‍के लाभांश म्हणून १. ५३ लाखांचे वितरण सुरू असल्याची माहिती देण्यात आली. संस्थेची आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी ठेवी वाढवण्याचे आवाहन करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. सभेला चांगला प्रतिसाद मिळाला.
...........
कर्जत आगरी समाज संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कर्जत (बातमीदार) ः कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने दहावी व १२ वीतील १६० गुणवंत विद्यार्थ्यांचा नेरळ येथे गौरव करण्यात आला. हिराजी पाटील सामाजिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास खासदार संजय दिना पाटील, महेंद्र घरत, वामन म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शालेय बॅग आणि हिराजी पाटील यांची प्रतिमा प्रदान करण्यात आली. विशेष गुणवंत दोन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात करिअर मार्गदर्शन सत्रही आयोजित करण्यात आले. महेंद्र घरत यांनी वसतीगृहासाठी २५ लाख आणि सभागृहासाठी १० लाख निधी जाहीर केला. समाजासाठी वसतीगृह, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, आणि आगरी शाळा सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला.
...........
कालवणमध्ये वृक्षारोपण व स्वच्छता
माणगाव (बातमीदार) ः माणगाव तालुक्यातील कालवण गावात मैत्री दिनाचे औचित्य साधून तरुणांनी एकत्र येत वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवली. गावातील मंदिर परिसर, रस्ते आणि मैदान स्वच्छ करण्यात आले. येत्या गणेशोत्सवात अडचण होऊ नये म्हणून गवत कापणी व तणनाशक फवारणी करण्यात आली. सीड बॉलच्या साहाय्याने आधुनिक पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात सहभाग घेतलेल्या तरुणांनी निसर्गाशी मैत्रीचा अनुभव घेतल्याचे सांगितले. चार तास चाललेल्या मोहिमेत स्वच्छता, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला गेला. या स्तुत्य उपक्रमाने गावात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.
..............
मंगेश राऊत यांचे निधन
अलिबाग ः मापगाव येथील मंगेश राजाराम राऊत (वय ५९) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते चोंढीतील श्री क्लासेसचे संस्थापक संतोष राऊत यांचे बंधू होते. ते वडखळ येथील जेएसडब्ल्यू कंपनीत बसचालक म्हणून कार्यरत होते. रविवारी सकाळी मापगाव येथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व परिवार आहे. दशक्रिया विधी १२ ऑगस्ट, तर बारावे १४ ऑगस्ट रोजी होणार आहे. कोणताही दुखवटा स्वीकारला जाणार नाही, असे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.
...............
चिल्ड्रन फ्युचर इंडियातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
पेण (बातमीदार) ः चिल्ड्रन फ्युचर इंडियातर्फे जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि निराधार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या संस्थेने १३२ गावांत ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना आधार दिला आहे. यावर्षी १५० विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमात सायबर क्राइमविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. विद्युत लता मांजरेकर, सुवर्णा कोल्हे, रत्नाकर भोईर सहभागी होते. डॉ. किशोर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व विशद करत त्यांना उज्ज्वल भविष्याची शुभेच्छा दिल्या.
...............
जवान कमलाकर भऊड यांचे स्वागत
पेण (वार्ताहर) ः भारतीय सैन्यात १७ वर्ष सेवा करून निवृत्त झालेले हवालदार कमलाकर भऊड यांचे जावळी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक, घोषणाबाजी आणि फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले. अनेक लढायांमध्ये सहभागी असलेले भऊड यांची सेवा भावी पिढीसाठी प्रेरणादायक ठरली आहे. याप्रसंगी जि. प. सदस्य डी. बी. पाटील, स्वप्निल म्हात्रे, श्वेता म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
.................
अंजुमन इस्लाम जंजिरा-मुरुड संस्थेच्या अध्यक्षपदी नाजीम चोगले
मुरूड (बातमीदार) ः अंजुमन इस्लाम जंजिरा-मुरूड संस्थेच्या अध्यक्षपदी नाजीम चोगले, तर सचिवपदी डॉ. निसार बिरवाडकर यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्ह्यातील मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा आदी भागातील मुस्लिम समाज या संस्थेशी जोडले गेले आहेत. संस्थेच्या विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांचीही निवड झाली. निवडणूक अधिकारी मुश्ताक मुकादम यांनी नवनिर्वाचितांची यादी सादर केली. नवनिर्वाचितांनी मनोगत व्यक्त करत पुढील कार्याचा संकल्प व्यक्त केला.
..............
गणपत काळसेकर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा
माणगाव (वार्ताहर) ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील भांडार पडताळणी अधिकारी गणपत (श्याम) काळसेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. मंत्री भरत गोगावले आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. ३५ वर्षांच्या सेवेत त्यांनी प्रामाणिकपणे कार्य केले. त्यांच्या शिस्तप्रियतेचा विशेष उल्लेख करण्यात आला. कार्यक्रमात पर्यावरण रक्षणाचा संदेश देत मान्यवरांनी वृक्षारोपणही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com