मॅरेथॉनसाठी ठाणे - बदलापूर विशेष लोकल

मॅरेथॉनसाठी ठाणे - बदलापूर विशेष लोकल

Published on

मॅरेथॉनसाठी ठाणे-बदलापूर विशेष लोकल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : ३१वी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन रविवारी (ता. १०) पार पडणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंना वेळेत पोहोचता यावे, यासाठी रविवार सकाळी पाच वाजता बदलापूर ते ठाणे व दुपारी एक वाजता ठाणे ते बदलापूर विशेष लोकल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले. तसेच या स्पर्धेत पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनदेखील माळवी यांनी केले.

मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास २५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असून, स्पर्धेची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता महापालिका मुख्यालय चौकातून होणार आहे. यंदा स्पर्धेत १२ वेगवेगळ्या गटांत धावपटू भाग घेणार आहेत. टाईम टेक्नॉलॉजीचा वापर २१ किमी पुरुष व महिला तसेच १८ वर्षांवरील व १० किमी स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. स्पर्धकांसाठी शुक्रवारी (ता. ८) बीप एक्स्पोमध्ये टी-शर्ट व चेस्ट नंबरचे वाटप होणार असून, यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.

मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये यंदा मोठी वाढ केली असून, २१ किमी स्पर्धेतील विजेत्यांना एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेपूर्वी महापालिका मुख्यालयासमोर झुंबा वर्कआउटचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच महापालिका अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींसाठी एक किमीची कॉर्पोरेट रनही ठेवण्यात आली आहे. ऑफलाइन नोंदणी सुमारे १३,८६० झाली असून, ऑनलाइन नोंदणी १,८५० इतकी आहे. यामध्ये विविध वयोगटांतील धावपटू सहभागी झाले आहेत. महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवादेखील उपलब्ध करून दिली आहे.

उपायुक्त उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आणि मीनल पालांडे यांसह अनेक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित राहून मॅरेथॉनसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

ऑफलाइन नोंदणीला अधिक प्रतिसाद
मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑफलाइन नोंदणी १३ हजार ८६० इतकी झाली आहे. यामध्ये १२ वर्षांखालील मुले तीन किमी दोन हजार ३७८, मुली तीन किमी दोन हजार ५१, १५ वर्षांखालील मुले ‍पाच किमी चार हजार ६४१, मुली पाच किमी चार हजार १८, १८ वर्षांखालील मुले १०‍ किमी ९६५, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक महिला एक ‍किमीसाठी २२, पुरुष ११ तर कॉर्पोरेट रन एक किमीसाठी १४ अशी नोंदणी झाली आहे. तर ऑनलाइन नोंदणी एक हजार ८५० इतकी झाली आहे. पुरुष २१ ‍किमी खुला गट ६१०, महिला २१ किमी १९०, १८ वर्षांवरील मुले १० किमीसाठी ७३०, १६ वर्षांवरील मुली १० किमी ३२० इतकी नोंदणी झाली आहे.

कॉर्पोरेट रन
महापालिका अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक किमीची कॉर्पोरेट रन ठेवण्यात आली असून या स्पर्धेत महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.

वातावरणनिर्मितीसाठी झुंबाचे आयोजन
यंदाची ठाणे महानगरपालिका ही सहा वर्षांनी होत आहे. स्पर्धेच्या दिवशी वातावरणनिर्मिती व स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धेकरिताच्या सरावासाठी झुंबा वर्कआउटचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयासमोर उभारण्यात येणाऱ्या स्टेजसमोर झुंबा वर्कआउट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com