नवी मुंबईत अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये वाढ
नवी मुंबईत अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये वाढ
अंनिसकडून २४ ऑगस्टला विशेष शिबिर
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : नवी मुंबईसारख्या आधुनिक आणि सुशिक्षित शहरात अलीकडच्या काळात अंधश्रद्धेच्या माध्यमातून फसवणूक व भीती निर्माण करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्यासाठी अंनिसच्या बेलापूर-नेरूळ शाखेतर्फे रविवार २४ ऑगस्ट रोजी बेलापूर येथील आग्रोळी गावातील कॉम्रेड बी. टी. रणदिवे ग्रंथालयात एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
बेलापूर परिसरात नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात, एका मांत्रिकाने पैसे दुफ्पट करून देतो, असे आमिष दाखवून एका वकिलाची तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक केली. त्याचप्रमाणे बेलापूर कोर्ट परिसरातही लिंबू-मिरची टाकून भीतीदायक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)-बेलापूर-नेरूळ शाखेने या प्रकारांचा तीव्र निषेध केला आहे. तसेच लिंबू-मिरची टाकणे, जादूटोणा करून भीती निर्माण करणे हे, जादूटोणा विरोधी कायद्याखाली गुन्हा आहे. अशा प्रकारांपासून नागरिकांनी सावध राहावे, अशा प्रकारांना बळी न पडता न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन अंनिसकडून करण्यात आले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्यासाठी अंनिसच्या बेलापूर-नेरूळ शाखेतर्फे रविवार २४ ऑगस्ट रोजी बेलापूर येथील आग्रोळी गावातील कॉम्रेड बी. टी. रणदिवे ग्रंथालयात एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात करणी, भूत-भानामती, बुवाबाजी, चमत्कार यांसारख्या विषयांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती दिली जाणार आहे. नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे व अंधश्रद्धाविरोधात सजग भूमिका घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरासाठी नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ ऑगस्ट असून अधिक माहितीसाठी राजीव देशपांडे (९१३६१०९८४५), रमेश साळुंखे (९२२४३४०७२०) आणि विजय खरात (९७५७२४९४८६) यांच्याशी संपर्क साधावा.